सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही – शरद पवार

माझ्यामुळे सरकारला झाली बैठकीची बुद्धी

मुंबई – राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण असून नागरिकांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा मिळत नसताना या परिस्थितीचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांना नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे पीककर्ज तात्काळ माफ करावे, सर्व प्रकारची वसूली थांबवावी, अशी मागणी करताना मी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा सुरू केला नसता तर या सरकारला दौरे, बैठका करायची देखील बुद्धी झाली नसती असा टोलाही त्ऐयांनी लगावला.

दुष्काळ निवाराणावर उपाय योजना आखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शनिवारी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आदींकडून शरद पवार यांनी प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, नवाब मलिक यावेळी उपस्थित होते. दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठीच्या मागण्या यावेळी तयार करण्यात आल्या. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेउन त्यांना या मागण्या सादर करणार असल्याचे शरद पवार म्हणाले. संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भाग यात दुष्काळाची भीषण छाया असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, नेहमीच्या पीकासोबतच फळबागा वाचविण्यासाठीही सरकारने पाण्याची उपलब्धता करून दिली पाहिजे. सरकारने चारा छावण्यांत 90 रूपये प्रति जनावर ठरवून दिलेली रक्‍कम अतिशय अपुरी आहे ती वाढवून देण्याची गरज आहे. दुष्काळग्रस्त भागातील मुलांच्या प्रवेशाची फी सरकारने भरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


राज ठाकरेंची पाठराखण
निवडणूक आयोगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून निवडणूक सभांचा खर्च मागितला आहे. या मुद्यावर पवार यांनी राज यांची पाठराखण केली आहे. ते स्वत: उमेदवार नाहीत. त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार नाही मग कोणत्या आधारावर निवडणूक आयोगाने राज यांच्याकडून सभांचा खर्च मागितला असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.


माझा लोकशाहीवर विश्वास
बारामतीची जागा पडली तर हिंसाचार होईल असे मी म्ऐहणाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे पूर्णपणे असत्य आहे.माझा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. मी असे वक्‍तव्य कधी केले नाही आणि करूही शकत नाही. मी 14 निवडणूका लढविल्या त्या काही कायदा हातात घेउन लढविल्या नाहीत असेही शरद पवार म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.