आताचे मुख्यमंत्री केवळ पुष्पचक्र वाहायला गडचिरोलीत जातात – शरद पवार

मुंबई – आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील हे गडचिरोलीला सातत्याने भेट देत होते. मात्र, आता ज्यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे ते देवेंद्र फडणवीस हे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर केवळ शहिदांवर पुष्पचक्र वाहायला येतात, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. नक्षलवाद ही काही आजची समस्या नाही. मी मुख्यमंत्री असतानाही ही समस्या होती. नक्षलवादाकडे केवळ कायदा व सुव्यवस्थेची बाब म्हणून बघितले जाउ नये. स्थानिक विकासाचाही मुद्दा या समस्येच्या निराकरणासाठी महत्वाचा असतो. विषमता दूर करण्याची भावना निर्माण करावी लागते. अर्थसंकल्पात त्यासाठी विशेष तरतूद करावी लागते. आमच्या सरकारच्या कार्यकाळात गृहमंत्रीपद आर.आर.पाटील यांच्याकडे होते. ते स्वत: सांगलीचे असूनही गडचिरोलीचे पालकमंत्रीपद त्यांनी मागून घेतले होते. महिन्यातून किमान एकदा तरी आबा तिथे स्वत: जात असत. तेथील प्रश्नांचा पाठपुरावा करत असत. पण सध्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसे करताना दिसत नाहीत. ते स्वत: विदर्भाचे आहेत. त्यांना तेथील प्रश्नांची जास्त माहिती आहे. पण ते केवळ हल्ल्यानंतर पुष्पचक्रच वहायला येतात अशीच स्थानिक जनतेची भावना आहे ही बाब चिंताजनक असल्याचेही शरद पवार म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.