लोकसभेच्या निकालावर आमदारकी अवलंबून

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण : सर्वांच्या नजरा निकालाकडे

दिगंबर आगवणेंच्या प्रयत्नांना यश मिळणार ?

फलटण विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्यासाठी दिगंबर आगवणे यांचे मागील दहा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. सन 2014 च्या निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. मात्र, ऐनवेळी त्यांना कॉंग्रेसकडून निवडणूक लढवावी लागली. त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आगवणे यांनी रणजितसिंह ना. निंबाळकर यांना साथ दिली तसेच फलटण विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे साहजिकच रणजितसिंह ना. निंबाळकर विजयी झाले तर आगवणेंचा आमदारकीचा मार्ग सुकर होणार आहे.

सातारा – जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात यंदा मतांची टक्केवारी वाढल्यामुळे लढत जोरदार झाली असल्याचे स्पष्ट आहे. परिणामी 23 मे रोजी लागणारा निकाल अथवा मताधिक्‍क्‍याची संख्या धक्कादायक असण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचार यंत्रणा राबविणारे विद्यमान आणि भावी आमदारांचे देखील भवितव्य 23 मे रोजी लागणाऱ्या निकालावर अवलंबून असणार आहे.

जिल्ह्यातील सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई, कोरेगाव, सातारा-जावली, कराड-उत्तर, कराड-दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघात सरासरी 60 टक्के मतदान झाले आहे. सहा ही विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांसह आमदारकीच्या दृष्टीने तयारी करत असलेल्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रचार यंत्रणा राबविली. विशेषत: कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी खा. उदयनराजे यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्याचबरोबर आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील शक्‍य तेवढी प्रचार यंत्रणा राबविली. तर दुसऱ्या बाजूला पाटणचे आमदार शंभुराज देसाई यांनी नरेंद्र पाटील यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार केला. मात्र, ते पाटण वगळता इतर विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना दिसून आले नाहीत.

मात्र, उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी मोर्चेबांधणी करित असलेल्या सर्व उमेदवारांनी पाटील यांचा सक्रिय प्रचार केला. विशेषत: कराड-दक्षिणमधून अतुल भोसले, कराड-उत्तरमधून मनोज घोरपडे, सातारा-जावलीमधून दिपक पवार, वाईमधून मदन भोसले, कोरेगावमधून महेश शिंदे यांनी लोकसभेच्या निमित्ताने आपापल्या विधानसभा मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली. असे असले तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघातील माण-खटाव आणि फलटण विधानसभा मतदारसंघात जोरदार घडामोडी झाल्या. माढा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर प्रथमच सातारा जिल्ह्यातील आणि फलटण तालुक्‍यातील व्यक्तीला रणांगणात उतरण्याची संधी प्राप्त झाली. संधी प्राप्त करण्यासाठी रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर पाणी सोडले आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साहजिकच फलटण विधानसभा मतदारसंघात रामराजे ना. निंबाळकर गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय शिंदे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. कारण, रणजितसिंह ना. निंबाळकर यांचा विजय झाला तर त्याचा थेट परिणाम फलटण विधानसभा मतदारसंघावर होणार आहे. रणजितसिंह विजयी झाले स्वाभाविकपणे फलटण विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी ते प्रयत्न करणार. म्हणूनच ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी सत्तास्थान टिकविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तर दुसऱ्या बाजूला माण-खटाव विधानसभा मतदारसंघात मात्र, वेगळेच चित्र पाहायला मिळाले.

गोरे बंधूनी राष्ट्रवादीच आपला शत्रू मानून रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबविली. त्यासाठी विशेषत: आ. जयकुमार गोरे यांनी आपली आमदारकी पणाला लावली. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांनी देखील रणजिसिंह ना. निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जोरदार प्रयत्न केले. राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख, मनोज पोळ व पदाधिकाऱ्यांनी संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ शक्‍य तेवढे प्रयत्न केले. ह्यामागे साहजिकच विधानसभेचे गड मजबूत रहावे तर गड ताब्यात घेण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने भूमिका बजावली आहे. त्यामुळे साहजिकच 23 मे रोजी नेमका निकाल काय लागतो? कोणाचे गड शाबूत राहतात? आणि कोणाचे गड ढासळतात ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)