पिंपरी – नवी सांगवी येथे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साई चौकात आठ वाहने फोडणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेत तिघांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. तोडफोड करणारे आरोपी मामा-भाचे आहेत. त्यातील भाच्याला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गणेश खरात असे ताब्यात घेतलेल्या आरोपी भाच्याचे नाव आहे. याप्रकरणी हेमंत काळुराम रासकर (वय 31, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आकाश धुतडमाल आणि योगेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांचा पोलीस शोध घेत आहेत.
हेमंत रासकर हे साई चौक नवी सांगवी येथील हॉटेल मल्हार मिरॅकल गार्डन समोर सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला त्यांची कार (एम एच 14 / जी यू 6152) पार्क करून झोपले होते. आरोपी मोपेड दुचाकीवरून आले. त्यांनी हेमंत यांच्या कारची तोडाफेक केली. तसेच हॉटेल मल्हार, मिरॅकल गार्डन ते कृष्णाई नगरी, साई चौक नवी सांगवी या दरम्यान रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर दगडे मारुन तोडफोड केली. पोलिसांनी तातडीने शोध घेत गणेश खरातला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे दोन मामा पळून गेले आहेत.