चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : ज्युवेंटसला अजॅक्‍सकडून पराभवाचा धक्‍का

तुरीन – ज्युवेंटसचा नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला बुधवारी ज्युवेंटसचा पराभव टाळता आला नाही. तुलनेने कमकुवत मानल्या जाणाऱ्या अजॅक्‍सने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात ज्युवेंटसवर 2-1 अशी मात करून उपांत्य फेरी गाठत ज्युवेंटसचे आव्हान संपुष्टात आणले.

10 एप्रिल रोजी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात अजॅक्‍सने ज्युवेंटसला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. परंतु दुसऱ्या उपांत्य सामन्यात अजॅक्‍सने ज्युवेंटसचा 2-1 असा पराभव करत 3-2 अशा गोल फरकाने उपांत्य फेरीतील स्थान निश्‍चित केले.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी कमालीची चुरस पाहायला मिळाली. रोनाल्डोने 28व्या मिनिटाला हेडरद्वारे अफलातून गोल करत ज्युवेंटसला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. चॅम्पियन्स लीगमधील आतापर्यंतच्या कारकीर्दीतील त्याचा हा 126वा गोल ठरला. मात्र 34 व्या मिनिटाला 21 वर्षीय डॉनी व्हॅन डे बीकने गोल करत अजॅक्‍सला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने मध्यांतरापर्यंत सामना 1-1 अशा बरोबरीत राहिला.

दुसऱ्या सत्रात ज्युवेंटसने अधिक आक्रमक खेळ केला. मात्र, अजॅक्‍सच्या मॅथिग्स डी’लेट या किशोरवयीन खेळाडूने 64व्या मिनिटाला हेडरद्वारे संघासाठी दुसरा व निर्णायक गोल नोंदवून अजॅक्‍सच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. आता उपांत्य फेरीत अजॅक्‍सची गाठ मॅंचेस्टर सिटी आणि टॉटेनहॅम यांच्यातील विजेत्याशी पडणार आहे. अजॅक्‍सने यंदाच्या मोसमाता रियल माद्रिदसारख्या बलाढ्य संघालादेखील पराभवाचा धक्का दिला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)