कातिल सिद्धीकी खून खटल्यात दोघे निर्दोष

 2012 मध्ये येरवडा कारागृहाच्या अंडासेलमध्ये झाला होता खून


 इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी असल्याचा होता संशय

पुणे – संशयित दहशतवादी कातिल सिद्धीकीचा येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून केल्याच्या खटल्यातून कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांना निर्दोष सोडण्यात आले आहे.

याप्रकरणी खटल्यात दोषारोप निश्‍चिती झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी खटल्याच्या सुनावणीला सुगथवात झाली होती. सरकारी पक्षातर्फे विलास घोगरे-पाटील यांनी कामकाज पाहिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. महमंद कातिल महमंद जाफर सिद्दीकी ऊर्फ सज्जन ऊर्फ साजन ऊर्फ शहजादा सलीम (वय 27, रा. बिहार) याचा कारागृहातील अतिसुरक्षा विभाग म्हणजे अंडासेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने 8 जून 2012 रोजी गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कुख्यात गुंड शरद हिरामण मोहोळ (34, रा. माऊलीनगर, सुतारदरा कोथरूड ता. मुळशी) आणि आलोक शिवाजीराव भालेराव (वय 28, रा. मु.पो. मुठा, ता. मुळशी जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्याची सुनावणी सुरू असताना काही साक्षीदार फितूर झाले होते. या प्रकरणी दाखल आरोपपत्रानुसार, जर्मन बेकरी स्फोटाच्या वेळेस दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी हा इंडियन मुजाहिदीन संघटनेशी संबंधित असल्याचे एटीएसने केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. सहा दहशतवाद्यांसमवेत दिल्ली पोलिसांनी सिद्दीकीला अटक केली होती. 13 फेब्रुवारी 2010 रोजी पुण्याच्या जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला होता. त्या अनुषंगानेही कातिल याचा तपास करण्यात आला होता. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहातीलअंडासेलमध्ये करण्यात आली होती. त्याचवेळी शरद मोहोळ आणि आलोक भालेराव हे अंडासेलमधील वेगवेगळ्या बराकीमध्ये होते. त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “घटनेच्या दिवशी सकाळी कातिल हा अंडासेलच्या मोकळ्या जागेत फिरत असताना आलोक आणि त्याच्यामध्ये बातचीत सुरू होती. याचदरम्यान अलोकला आणि शरदला कातिल त्याच दिवशी दिल्ली येथे जाणार असल्याचे समजल्याने त्यांनी त्याच वेळी कातिलच्या सेलमध्ये जाऊन त्याचा शरदने बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून फास दिला. विरोध करू नये, यासाठी आलोकने त्याचे पाय धरले. दोन्ही नाड्या जाळून त्यांची राख टॉयलेटच्या भांड्यात टाकली होती. त्यानुसार दोघांवर संगनमत करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)