पिंपरी – महापालिकेतील विषय समित्यांच्या सभापती पदावर शुक्रवारी (दि. 14) भाजपच्या चार नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. विधी समिती सभापती पदासाठी अश्विनी बोबडे, महिला व बालकल्याण समितीसाठी निर्मला कुटे, शहर सुधारणा समितीसाठी राजेंद्र लांडगे तर, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापती पदी तुषार हिंगे यांना संधी मिळाली आहे.
महापालिकेच्या दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या विषय समित्यांच्या विशेष सभांमध्ये ही निवड करण्यात आली. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. विषय समित्यांसाठी 10 तारखेला अर्ज दाखल करण्यात आले होते. त्या वेळीच प्रत्येक समितीसाठी भाजपतर्फे प्रत्येकी एकाच नगरसेवकाने अर्ज दाखल केल्याने निवड निश्चित होती. त्याच्यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले. भाजप आणि शिवसेनेची केंद्रात व राज्यात सत्ता आहे. महापालिकेची निवडणूक मात्र भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे लढविली आहे. महापालिकेत प्रभाग समिती अध्यक्ष किंवा विषय समितीचे एखादे सभापती पद शिवसेनेच्या पारड्यात पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने ही अपेक्षा फोल ठरविली. प्रभाग समितीपाठोपाठ सर्व विषय समित्यांचे सभापती पद भाजपकडेच ठेवले आहे.