जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविला उपक्रम : शेकडो कार्यकर्ते सहभागी
सातारा – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सदरबझार, सातारा येथील भारतमाता मंडळाने वेण्णा नदीत स्वच्छता मोहिम राबविली. शनिवारी सकाळी शेकडो कार्यकर्त्यांनी तब्बल चार तास श्रमदान करून नदीतील प्लास्टीक, जलपर्णी काढली. दरम्यान, सातारा शहरातील सार्वजनिक मंडळाने प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आला असून त्यानिमित्ताने पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी शहरी नागरिक जागरूक झाल्याचे दिसून आले.
स्वच्छ भारत अभियान व नमामी कृष्णा-वेण्णा नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत भारतमाता मंडळाने वाढे फाटा नजिक वेण्णा नदीची स्वच्छता मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी सकाळी मंडळाचे कार्यकर्ते खोरे व घमले घेवून नदीपरिसरात दाखल झाले. नदीपात्रात नैसिर्गिकपणे जलपर्णीचे जाळेच निर्माण झाले होते. त्याचबरोबर वाढे फाटा नजिक असलेल्या व्यवसायिकांचा कचरा नदीपात्रात आढळून आला. तसेच मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांचे साम्राज्य पदीपात्रात जमा झाले होते. तब्बल चार तास नदीपात्रात परिश्रम करून तीन ट्रॉली कचरा नदीपात्रातून काढण्यात आला.
सातारा शहरातील प्रमुख मंडळांपैकी एक अशी ओळख असलेल्या भारतमाता मंडळाने स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतल्यामुळे येत्या काळात इतर देखील मंडळे आपल्या परिसरातील नदी, नाले स्वच्छतेसाठी जागरूक होणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने भारतमाता मंडळाने उचललेले पाऊल सातारकरासाठी आगामी काळात दिशादर्शक ठरणार आहे. दरम्यान, भारतमाता मंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेत तानाजी भणगे,सतीश कांबळे, महेश निकम,विनीत भोसले, सोहम यादव,प्रतिम इंगवले, सुजित जाधव, गणेश भोसले, राहूल भणगे, अजिंक्य सपकाळ, अजय गुजर,प्रशांत जगताप, विशाल जाधव,अनिश साबळे,मुकुंद देशपांडे, श्रीराम कोळी,भारत गिरुलकर,प्रथमेश भणगे, सचिन जाधव, योगेश जाधव,प्रविण जगदाळे, विशाल कोळी,अनिल लाड,राजेंद्र रजपूत,विकास धुमाळ ,राहुल इंगवले, प्रवीण थोरात, प्रशांत थोरात यांनी सहभाग घेतला.