चार नगरसेवक 20 मिनिटे लिफ्टमध्ये अडकले

बारामती नगरपरिषदेतील प्रकार : श्‍वास घेण्यात अडचणी

बारामती – बारामती नगरपरिषद इमारतीच्या लिफ्टमध्ये चार नगरसेवकांसह इतर दोघे अडकल्याची घटना गुरुवारी (दि. 6) दुपारी घडली. 20 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर या नगरसेवकांना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून मदत मिळाली.

नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक पाचमधील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरपरिषदेच्या आवारात नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गुरुवारी अर्ज दाखल झाल्यानंतर काही वेळाने कामकाज आटोपून उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, नगरसेवक सत्यव्रत काळे, अमर धुमाळ, गणेश सोनवणे यांच्यासह सिद्धनाथ भोकरे व पांडुरंग चौधर दुसऱ्या मजल्यावरून लिफ्टमधून तळमजल्यावर येत होते. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तळमजल्यावर पोहोचल्यानंतर लिफ्टचा दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे आतील नगरसेवकांनी फोनाफोनी सुरू केली.

गटनेते सचिन सातव तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून लिफ्ट बंद पडली असल्याचे सांगितले. त्यानंतर अडकलेल्या नगरसेवकांसह इतरांना मदत मिळण्यासाठी यात 20 मिनिटांचा कालावधी गेला. दरम्यानच्या काळात अडकलेल्या सर्वांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. तर पांडुरंग चौधरी यांना चक्‍कर आल्यासारखे झाले. त्यानंतर प्रसंगावधान राखत नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी संपूर्ण ताकदीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाने दरवाजा उघडला नाही; मात्र हवा आत येईल एवढी फट तयार झाली. त्यानंतर सर्वांच्या जीवात जीव आला. अखेर प्रशासकीय कर्मचारी धुमाळ लिफ्टच्या दरवाजाची चावी घेऊन आले. त्यानंतर सर्वजण सुखरूप बाहेर पडले.

जनरेटरही बंद
प्रशासनाच्या गैरकारभारामुळे चार नगरसेवकांसह इतर दोन व्यक्‍ती लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. शहरात दिवसातील काही तास भारनियमन होते. असे असताना लिफ्ट सुरू राहण्यासाठी जनरेटरचा बॅकअप महत्त्वाचा आहे; मात्र जनरेटरही बंद पडल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या इमारतीच्या देखभालीकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.

 …तर सर्वसामान्यांचे काय?
उपनगराध्यक्ष, नगरसेवक लिफ्टमध्ये अडकल्यानंतर नगरपरिषद इमारतीमधील सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नगरपरिषदेचा कारभार करणारे नगरसेवकच असुरक्षित असतील, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे लिफ्टमध्ये काही अडचण आल्यास तात्काळ मदतीसाठी कुठल्याही प्रकारचा संपर्क क्रमांक नसल्याचे निदर्शनास आले. सर्वसामान्य तसेच वयोवृद्धांच्या बाबतीत हा प्रकार घडल्यास मदतीची हाक द्यायची कशी? हा प्रश्‍न यामुळे निर्माण झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.