विविधा: अण्णा भाऊ साठे

माधव विद्वांस

स्वातंत्र्यपूर्व काळातील अस्सल ग्रामीण जीवनाचे अंतरंग उलगडून दाखवणारे कै. शाहीर अण्णा भाऊ साठे (तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे) यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील कासेगावजवळील वाटेगाव येथे झाला. लहानपणापासूनच ते उत्कृष्ट दांडपट्टा चालवित. त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. याशिवाय रानोमाळी एकटे भटकणे, पोहणे, विविध पक्ष्यांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे नानाविध छंद त्यांनी जोपासले होते. शाळेत ते फक्‍त एक ते दीड दिवस गेले. तत्कालीन जातीयव्यवस्थेमुळे चांगली वागणूक मिळत नसल्याने ते शाळेत रमले नाहीत.

वडील मुंबईला मोलमजुरी करीत. गावाकडे त्यांची आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यातच दुष्काळामुळे ते आईवडिलांबरोबर मुंबईला गेले व भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला लागले. मुंबईत आल्यावर त्यांनी पडेल ती कामे केली. हमाल, बूट पॉलीश, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणे, मुलांना खेळविणे, उधारी वसूल करणे, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे त्यांनी केली.

त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचाही प्रभाव होता. मुंबईत आल्यावर फावल्या वेळेत सिनेमा व गिरगावातील तमाशागृहात तमाशा बघत असत. येथेच त्यांची प्रतिभा जागृत होऊ लागली. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. ते चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित असत. त्यातून ते साक्षर झाले व वाचकही झाले. त्यांना वाचनाची गोडी लागली. दरम्यान, त्यांची नोकरी सुटल्याने ते वाटेगावला परत आले. मुंबईतील वातावरणातून आल्याने त्यांना वाटेगावात करमेना. त्यांनी वाटेगाव सोडले व नातेवाईकांच्या तमाशा फडात सामील झाले. तमाशा फडात लागणारे आवश्‍यक गुण त्यांचेकडे उपजतच होते. ते फडातील सर्व वाद्ये वाजवीत. तसेच गीते, तमाशातील संवाद लिहू लागले. रांगड्या तमाशाला “लोकनाट्य’ हे बिरूद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनीच दिले.

विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते; परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. त्याचवेळी ते साम्यवादी चळवळीकडे ओढले गेले. अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द. ना. गव्हाणकर या त्रयींनी कलापथकाची 1944 साली स्थापना केली व त्याद्वारे साम्यवादाचा प्रसार करू लागले. त्यांच्या प्रतिभेचा त्यांनी या कार्यासाठी प्रभावीपणे वापर केला, त्यामुळे ते चळवळीतील अग्रणी झाले. पुढे त्यांनी संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीत झोकून दिले.
हळूहळू अण्णांनी लेखन सुरू केले. त्यांच्या “फकिरा’ व “वारणेचा वाघ’ या कादंबऱ्यांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. या दोन कादंबरींतून त्यांनी ग्रामीण जीवनाचे अंतरंग शहरी लोकांपुढे आणले. त्यानंतर विजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

त्यांची “फकिरा’ ही कादंबरी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात घेतली गेली. त्यांनी 250हून अधिक लावण्या व पोवाडे लिहिले, तर 300च्यावर कथा लिहिल्या. निवडणूक घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही वगनाट्ये लिहिली. त्यांनी रचलेले पोवाडेही खूप गाजले. त्यांच्या साहित्याचे हिंदी, गुजराथी, उडिया, बंगाली, तमिळ, मल्याळम्‌ या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील 27 भाषांमधे भाषांतर झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या 12 कथांवर चित्रपट निघाले. ते मितभाषी व भिडस्त असल्याने व्यावहारिक बाबतीत मात्र लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. त्यामुळे लेखनातून आर्थिक फायदा मात्र झाला नाही. भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा व अण्णांचा खूप स्नेह होता. त्यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)