…अन्‌ वरुणराजाचीही हजेरी

पुणे –
पावसाच्या धारा,
येती झराझरा !
टाळ, मृदुंगाचा संगे
वारकरी चाले भराभरा !!

विठुरायाच्या ओढीने टाळ-मृदंगाचा गजर आणि अभंग म्हणत पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वरुणराजाने आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे वारकरी सुखावला असून, “यंदातरी चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्यांचे शिवार फुलूदे’ अशी हाक वारकऱ्यांनी वरुणराजाला दिली.

शहरात मागील चार दिवसांपासून दररोज सायंकाळी पाऊस पडत असल्यामुळे पालखीच्या आगमनालाही वरुरणराजा दमदार हजेरी लावणार अशी शक्‍यता होती. मात्र, बुधवारी (दि.26) सकाळपासून उन्हाचा चटका वाढलेला होता. त्यामुळे घामाघूम झालेल्या वारकऱ्यांना पावसाच्या आगमनाची आस लागली होती. दुपारी साडेतीन वाजता ढगाळ वातावरण झाल्यामुळे, पाऊस पडणार अशी शक्‍यता असताना, पावसाने हुलकावणी दिली. मात्र, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज या दोन्ही पालख्या पाटील इस्टेटजवळ येताच साधारण सायंकाळी 5 वाजता वरुणराजाने हजेरी लावली. त्यामुळे वारकरी सुखावले.

पावसाला सुरुवात झाल्यावर पालखी सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांनीही पावसात भिजण्याचा आनंद घेत याची देही, याची डोळा हा सोहळा अनुभवला. ठिकठिकाणी वारकऱ्यांनी प्लॅस्टिक डोक्‍यावर घेतल्यावर सोहळ्यातील चित्रच बदलले. पावसामुळे सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)