एलईडी मासेमारी बंदीला मिळणार “पोलीस बळ’ 

गस्तीसाठी 6 नव्या बोटी खरेदी करणार 

कारवाईसाठी धोरण तयार करणार

एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार धोरण तयार करीत असून कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी सागरी भागातील जिल्ह्यांच्या लोकप्रतिनिधी, मच्छिमार संघटना आणि स्थानिकांच्या प्रत्यक्ष घेतलेल्या सूचनांचा समावेश या कायद्यात केला जाणार आहे. लवकरच या कायद्यासंदर्भातील अध्यादेश काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे रामदास कदम यांनी यावेळी सांगितले.  

मुंबई  – कोकणातील समुद्रात होणाऱ्या एलईडी मासेमारीला बंदी घालण्यासाठी आता मत्स्यविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीसबळ मिळणार आहे. त्यासाठी समुद्रात गस्ती घालण्यासाठी सहा नवीन बोटी खरेदी करणार असून 51 कोटी रूपयांच्या निविदा काढण्यात आल्या असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शस्त्रसज्ज असलेल्या बोटींच्या सहाय्याने गस्त घालणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

एलईडी मासेमारी बंदी कायद्यासंदर्भात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. एलईडी मासेमारी करणाऱ्यांना 5 हजार रुपये दंड आकारुन सोडले जायचे त्यामुळे या मासेमारीला आळा घालणे अडचणीचे ठरत होते. अशा मासेमारीवर कारवाई करण्यासंदर्भात राज्यसरकारचा स्वतंत्र कायदा अस्तित्वात नव्हता. या संदर्भात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेऊन कारवाई करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे, असे कदम म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.