अबाऊट टर्न : आभासमाया

हिमांशू

भारतात सिटीझन्सची संख्या नेटीझन्सपेक्षा कमी असावी, अशी दाट शंका मतदानाच्या टक्‍केवारीवरून येते. मतांचा टक्‍का फारसा वाढलेला नाही, असे अनेक ठिकाणी दिसत असताना, आपापल्या पक्षासाठी आभासी दुनियेत हिरीरीने भांडणाऱ्यांची संख्या मात्र दिवसागणिक वाढत चाललीय. जुनेपुराणे फोटो, व्हिडीओ बाहेर काढून आठवणी ताज्या केल्या जातात. विरोधाभास दाखवून दिले जातात. फेसबुकावरची पेजेस तात्पुरती बंद करणे, पुन्हा सुरू करणे असे प्रकार सांगितले जातात. अधिकृत पेजेस कोणती आणि अनधिकृत कोणती, यावरून वादळं उठलीत. रोज लाखो अकाउंट्‌स डिलीट करीत असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांच्या नजरेतून सुटलेली अकाउंट्‌स जाहीर सभेत दिसतात.

खऱ्या-खोट्या पोस्ट्‌सची पडताळणी करणाऱ्या वेबसाइटवाल्यांची धावपळ सुरू आहे. निवडणूक जणूकाही या आभासी विश्‍वातच चाललीय, असं अनेकांना ठामपणे वाटू लागले. मतदानही “ऑनलाइन’ करता आले तर काय धमाल येईल, अशी स्वप्नेही काहीजण पाहू लागले. जणू एक युद्धच घडवून आणणारे हे आभासी विश्‍व मात्र अजिबात सुरक्षित राहिलेले नाही. एका सेकंदाला हॅकिंगचे तीस प्रकार घडत असतील, तर मामला गंभीर आहे, असेच म्हणावे लागेल. “स्टेट ऑफ इंटरनेट सिक्‍युरिटी’ नावाच्या या अहवालात हॅकिंगच्या बाबतीत अमेरिकेच्या पाठोपाठ भारताचा जगात दुसरा नंबर लागलाय. या अहवालानुसार, भारतातले 120 कोटींपेक्षा जास्त अकाउंट्‌स असुरक्षित आहेत. सायबर हल्ले वाढत आहेत.

अमेरिकेत 125 कोटी अकाउंट्‌सवर हॅकर्सनी हल्ले केले. भारताची लोकसंख्या 135 कोटी. त्यात 120 कोटी अकाउंट्‌सपैकी खरी किती आणि बनावट किती, हाच मुख्य प्रश्‍न. 120 कोटी हा आकडासुद्धा धोक्‍यात असलेल्या अकाउंट्‌सचा आहे. बोगस मतदानाप्रमाणंच बोगस अकाउंट्‌सची परंपराही अगदी कमी कालावधीत रूढ झालीय, हे यावरूनच स्पष्ट होतं. परंतु इतका धोका असणाऱ्या विश्‍वाचा अंश होण्याची एवढी धडपड आपल्याकडे दिसते, की समोर बसलेल्या माणसाशी बोलायला अनेकांना वेळ राहिलेला नाही. संपूर्ण मनोरंजनविश्‍व हातात गवसल्यामुळं अनेकजण वास्तव जगात वावरायलाच तयार नाहीत. या मंडळींना खेळसुद्धा ऑनलाइन खेळायचेत आणि चित्रपटसुद्धा ऑनलाइन बघायचेत. अर्थातच मग या क्षेत्रातसुद्धा चोऱ्यामाऱ्या धुमधडाक्‍यात सुरू आहेत.

हॉलिवूडमधल्या बहुचर्चित “ऍव्हेंजर्स’ मालिकेतला शेवटचा चित्रपटसुद्धा लीक झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला. कोट्यवधी रुपये ओतून तयार केलेले चित्रपट असे हातोहात चोरीला जात असतील, तर निर्मात्यांनी करायचं काय? “ऍव्हेंजर्स एन्डगेम’ हा चित्रपट “तमिळ रॉकर्स’ नावाच्या वेबसाइटवर लीक झाल्याचं ऐकून निर्मात्यांना केवढा धक्‍का बसला असेल! या चित्रपटाचे काही व्हिडीओ पूर्वीच लीक झाले होते म्हणे! त्यामुळे उरलेसुरले सिक्रेट तरी लीक करू नका रे बाबांनो, असं आवाहन निर्मात्यांनी संबंधितांना केले होते.

ज्या वेबसाइटने “ऍव्हेंजर्स एन्डगेम’ चित्रपट लीक केला, त्यांनी पूर्वीपासूनच हे कारभार केल्याचें उघड झाले. हॉलीवूड, बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट लीक करण्यात या मंडळींचा “हातखंडा’ आहे म्हणे! याबद्दल काहीजणांना अटक झाली होती; पण तरीही चित्रपट लीक होण्याचे प्रकार थांबले नाहीत. तंत्रज्ञानाने खूप दिले आपल्याला; पण बरेच काही आपल्याकडून हिसकावलेय. सध्या एक विशिष्ट धुंदी असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीये. पण दिसेल तेव्हा वेळ गेलेली असेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)