शिरुर, मावळसाठी पीएमपीच्या 332 बसेस

प्रवाशांना त्रास होणार नाही, पीएमपी प्रशासनाची ग्वाही

पिंपरी – येत्या 29 तारखेला होणाऱ्या मावळ व शिरुर लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य पुरवण्यासाठी व विविध कामासाठी 332 पीएमपी बसेस धावणार आहेत. शिरुर आणि मावळ मतदारसंघात या बसेस वापरण्यात येणार असून यामुळे प्रवाशांना कमीत-कमी त्रास होईल, याची काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही पीएमपी प्रशासनाने दिली आहे.

मावळ आणि शिरुर लोकसभेचे मतदान येत्या 29 एप्रिलला होणार आहे. त्या अनुंषगाने मावळ अंतर्गत चिंचवड आणि पिंपरी विधानसभा तर, शिरुरमधील भोसरी आणि हडपसर मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावर पीएमपी सुविधा पुरवणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पीएमपीच्या प्रशासनासोबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. मतदान सामग्री गोदामातून विविध मतदान केंद्रात आणि मतदान झाल्यानंतर केंद्रातून पुन्हा त्या गोदामात ने-आण करण्यासाठी या बसचा उपयोग होणार आहे. त्यासाठी एकूण 332 बस पुरवण्यात येणार आहेत. त्यात, चिंचवड विधानसभा 93, पिंपरी विधानसभा 76, भोसरी विधानसभेला 84 आणि हडपसर विधानसभेसाठी 79 बस देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति बस आठ हजार रुपये पीएमपी आकारणार आहे.

येत्या रविवारी (दि. 28) नेमून दिलेल्या केंद्रात सकाळी आठ वाजता पोहचतील असे नियोजन असणार आहे. गोदामात ठेवलेले मतदान साहित्य तसेच, कर्मचारी हे त्या त्या केंद्रात पोहचणार आहे. त्यानंतर दुपारीनंतर बसचे काम संपल्यानंतर त्या मार्गावर जातील. तसेच, 29 एप्रिलला दुपारी त्या बस पुन्हा त्या केंद्रात पोहचतील आणि सर्व साहित्य घेवून पुन्हा त्या गोदामात जातील, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, त्या बसचा फटका मार्गावर बसू नये, यासाठी जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर आणण्यात येणार असल्याचे पीएमपीकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.