शिरूर, मावळसाठी 2,404 अतिरिक्त इव्हीएम

उमेदवार संख्या लक्षात घेऊन करण्यात आली होती मागणी

पुणे – शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर दोन इव्हीएमची आवश्‍यकता आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे सुमारे 2 हजार 404 अतिरिक्त इव्हीएमची मागणी केली होती. या अतिरिक्त मशीन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.

पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघापाठोपाठ आता शिरूर आणि मावळ मतदारसंघातही 15 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दोन इव्हीएमची (इलेक्‍ट्रिक वोटिंग मशीन) आवश्‍यकता आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे अतिरिक्त 2 हजार 404 इव्हीएमची मागणी केली होती.

इव्हीएमवर 15 उमेदवार आणि एक नोटा असे एकूण 16 बटन असतात. त्यामुळे एका इव्हीएमवर जास्तीत जास्त 15 उमेदवारांची नावे निश्‍चित करता येतात. पुणे लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार, बारामतीमधून 18 उमेदवार, मावळमधून 21 आणि शिरूरमधून 23 उमेदवार रिंगणात आहे. पुणे मतदारसंघात 1 हजार 997 मतदान केंद्र, बारामती मतदारसंघात 2 हजार 372 मतदान केंद्र, शिरूरमध्ये 2 हजार 227 मतदान केंद्र आणि मावळमध्ये 1 हजार 192 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर दोन इव्हीएम ठेवले जाणार आहे. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दि. 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जळगाव आणि नगर जिल्ह्यातून या मशीन जिल्हा प्रशासनाकडे आल्या असून संबंधित लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे या मशीन सुपूर्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)