शहरात म्हाडाची 1270 घरे उपलब्ध होणार

पिंपरीत 1256; तर वायसीएमजवळ 14 रो-हाऊस

पिंपरी  – सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाने शहरातील दोन ठिकाणी आपले गृहप्रकल्प सुरु केले आहेत. यामध्ये पिंपरी गावातील 1256 सदनिकांचा तर संत तुकारामनगर पोलीस चौकीसमोरी 14 रो-हाऊस प्रकल्पांचा समावेश आहे. या दोन प्रकल्पांपैकी पिंपरी गावातील गृहप्रकल्पाचे काम वेगाने सरु आहे; तर संत तुकारामनगरमधील प्रकल्पाच्या बांधकामासाठी आता पाया खोदण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पिंपरी वाघेरे येथील सर्वे क्रमांक 309 मधील प्रकल्पाच्या इमारतींचे काम मोठ्या वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. विविध उत्पन्न गटातील एकूण 1256 नागरिकांना ही घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. याशिवाय 32 कार्यालये आणि 36 दुकांनाचादेखील यात समावेश आहे. या प्रकल्पात एकूण 1 हजार 256 घरे आणि 68 कार्यालये व दुकाने उभारली जात आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 321 घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी 595 घरे तर उच्च उत्पन्न असलेल्या गटासाठी 340 घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.

शहरातील दुसरा प्रकल्प संत तुकारामनगर या परिसरात उभारला जात आहे. संत तुकारामनगर मधील सर्वे क्रमांक 172 मध्ये पोलीस चौकीसमोरील आरक्षित भूखंडावर या रो-हाउसच्या बांधकामासाठी खोदकाम सुरु करण्यात आले आहे. उच्चभ्रू वर्गासाठी 14 रो-हाऊस बांधली जाणार आहेत. यामध्ये प्रत्येक रो-हाऊस 974 चौरस फुटाचे असणार आहे. या रो हाऊसची किंमत 29 लाख 95 हजार असून, जी प्लस वन स्ट्रक्‍चर विथ पार्कींग तळमजला असे या रो-हाऊसचे स्वरुप आहे.

म्हाडाबरोबरच महापालिका, प्राधिकरणाच्या प्रकल्पांना पसंती

पिंपरी-चिंचवड शहातील आर्थिक दुर्बल घटकांबरोबरच अन्य नागरिकांसाठीदेखील महापालिका व प्राधिकरणाच्या वतीने शहराच्या विविध ठिकाणी गृहप्रकल्प उभारले जात आहेत. म्हाडाच्या वतीने उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या घरांपेक्षा या महापालिका व प्राधिकरणाच्या घरांसाठी तुलनेत लाभार्थीचा हिस्सा कमी असल्याने शहरातील नगारिकांचा या दोन्ही संस्थांच्या गृहप्रकल्पांना पसंती आहे. सध्या महापालिकेच्या वतीने शहरात चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी (मोशी) आणि रावेत या तीन ठिकाणी गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)