रेडा- वडापुरी येथे यात्रे निमीत्त प्रथमच महिलांच्या जंगी कुस्त्या भरविण्यात येणार असल्याने अनेक ठिकाणच्या महिला मल्ल या आखाड्यात सहभागी झाल्या असल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले. वडापुरी (ता. इंदापूर) येथील श्रीकाळ भैरवनाथ देवाची यात्रा शुक्रवार (दि.19) व शनिवारी होणार असून यात्रा कालावधीत दोन दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे यात्रा कमिटीने सांगितले. वडापुरी येथील भैरवनाथ देवाच्या यात्रे निमीत्त शुक्रवारी मंदिरात सकाळी श्रींचा अभिषेक, श्रीनाथ मंदिरातून पालखीचे व श्रीचे प्रस्थान, संध्याकाळी श्रींची भव्य मिरवणूक (छबीना) शोभेची कामे व रात्री करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी रामनवमीचे कीर्तन होणार असून संध्याकाळी भव्य अशा महिलांच्या व पुरुषांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.