भुलेश्‍वर मंदिरात चोरांची घुसखोरी

भुलेश्‍वर – महाराष्ट्रातील जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असलेल्या भुलेश्‍वर महादेवाच्या मंदिरामध्ये सोमवारी (दि.1) मध्यरात्रीनंतर अज्ञातांनी घुसखोरी करीत चोरी करण्याचा प्रयत्न केला.

श्रीक्षेत्र भुलेश्‍वर येथील सुरक्षारक्षक विजय खेंगरे व शंकर चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे व ग्रामस्थांच्या जागरुकतेमुळे चोरटे पळाले. रात्री 12 नंतर मंदिरासमोरील पाण्याच्या टाकीजवळ कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वाढल्याने सुरक्षारक्षकांनी त्या दिशेने जात पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी तीन अज्ञात इसम हातात काठ्या घेऊन उभे असल्याचे आढळून आले, त्यामुळे सुरक्षारक्षकांनी मंदिराजवळील सीसीटीव्ही यंत्रणा असलेल्या रूममध्ये जाऊन मंदिर परिसराची कसून पाहणी केली. त्यावेळी एकजण मंदिराच्या आत बॅटरीच्या उजेडात काहीतरी पाहात असल्याचे आढळून आले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी तातडीने मंदिराचे पुजारी व पुरातत्व विभागाचे अधिकारी, जेजुरी पोलीस स्टेशन, यवत पोलीस स्टेशन व काही ग्रामस्थांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. यामुळे सर्वांनी मंदिराकडे धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी संपूर्ण मंदिर व परिसराची पाहणी केली असता कोणीही आढळून आले नाही. यानंतर पुरातत्व विभागाचे राहुल बनसोडे यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्‍य पुन्हा तपासली असता सदर इसम मंदिराच्या वरील बाजूने वायव्य कोपऱ्यातून मंदिरात प्रवेश केल्याचे तसेच मंदिरातील शेजघर गाभाऱ्याचा मुख्य दरवाजातून आल्याचे आणि पुन्हा मागील बाजूने वर येऊन मंदिराबाहेर पडल्याचे आढळून आले.

जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे यांनी पथकासह भुलेश्‍वर मंदिर परिसराची पाहणी केली. पुरातत्व विभागाचे जुन्नर परिमंडळाचे शैलेंद्र कांबळे यांना सदर घटनेची माहिती राहुल बनसोडे यांनी कळवली. सकाळी 8:00 वाजता येऊन कांबळे यांनी मंदिर व परिसराची पाहणी केली व याव्यतिरिक्त सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी काही अंमलबजावणी करता येईल का, यासंदर्भात उपस्थित ग्रामस्थ पुजारी तसेच पुरवठा विभागाचे कर्मचारी यांच्याशी चर्चा केली.

भुलेश्‍वर मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवून तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून वरील बाजूने मंदीर पूर्णपणे बंदिस्त करून सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील.
– शैलेंद्र कांबळे, वरिष्ठ संरक्षक सहाय्यक, जुन्नर उपमंडल भारतीय पुरातत्व विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)