पाण्याची पातळी खालावली

आता पाणी कपातीशिवाय पर्याय नाही
मृतसाठ्यातून पाणी उपसा करावा लागणार : कडक उपाययोजना करण्याचे पाटबंधारे विभागाचे पत्र

नगर – नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. सध्या धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस सुरू असूनही नवीन पाण्याची आवक झालेली नाही. 1 हजार 752 फुटाच्या खाली धरणातील पाण्याची पातळी गेल्यानंतर शहराला तीव्र पाणीटंचाईची झळ बसले. आता त्या दिशेनेच वाटचाल सुरू झाली असून सध्या पातळी 1 हजार 753 फुटापर्यंत आली असून आणखी काही दिवसांनी ती पातळी 1 हजार 752 पर्यंत येण्यास वेळ लागणार. त्यानंतर महापालिकेला मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागेल. तो करण्यासाठी जास्त क्षमतेचे उपसापंप वापरावे लागतील. धरणातून पाणी उपसा व्यवस्थित झाला नाही तर पाणी कपातीशिवाय महापालिकेकडे पर्याय राहणार नाही.

पाऊस सुरू झाला असला तरी पिंपळगाव खांड धरण अद्याप 50 टक्‍के भरले आहे. ते धरण भरल्यानंतर नव्याने पाणी मुळा धरणात येते. पावसाचा जोर आता वाढला आहे. परंतु धरणात नव्याने पाण्याची आवक न झाल्याने मुळा धरणातील पाण्याची पातळीची चांगलीच खालावत आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी 1 हजार 753 फुटापर्यंत आली आहे. याकडे पाटबंधारे विभागाने महापालिकेचे लक्ष वेधले असून महापालिकेने तातडीने आता उपाययोजना कराव्यात असे स्पष्ट आदेश जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिले. नगर शहराला येत्या 15 जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु आता पाण्याची पातळीच खालवत असल्याने पाटबंधारे विभाग देखील चिंताग्रस्त झाला आहे.

1 हजार 752 फुटापर्यंत खाली पाण्याची पातळी गेल्यानंतर पाण्याचा उपसा करणे महापालिका कठीण होणार आहे. सध्यापेक्षा जास्त क्षमतेचे उपसा पंप बसवावे लागणार आहे. कारण थेट मृतसाठ्यातून हा उपसा होणार आहे. त्यामुळे पाटंबधारे विभागाने महापालिकेला उपाययोजना करण्याचे स्पष्ट सुचना दिल्या आहेत.

आता महापालिका काय करते याकडे लक्ष आहे. पाणी कपात न करता धरणातून जास्त क्षमतेचे पंप बसून पाणी उपसा करण्याचा नियोजन महापालिका करीत आहे. परंतु आडात नाही तर पोहऱ्यात कसे येणार असा प्रश्‍न आहे. नगर शहराची लोकसंख्या साडेचार ते पाच लाख पर्यंत आहे.
शहराला वर्षभरासाठी 1 दलघफु पाणी लागते.तर दररोज नगर शहरासाठी मुळा धरणातून 88 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात येतो. अर्थात शहराला दररोज 100 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. परंतु 12 दशलक्ष लिटर कमी पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे हे पाणी वितरण करतांना महापालिकेची कसरत होत आहे.

मुख्य शहरात दररोज पाणीपुरवठा होत असला तरी सावेडी उपनगरात दिवसाआड तर केडगाव उपनगरात तीन दिवसांनी, कल्याण रस्त्यावर शिवाजीनगर परिसराला दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. त्यात आता धरणातील पाण्याची पातळी 1 हजार 752 फुटापर्यंत खाली गेली तर पाण्याचा उपसा करणे अवघड होणार आहे. परिणामी पाणी कपातीचे धोरण महापालिकेला द्यावे लागणार आहे. मध्यतंरी महापालिका पाणी कपातीचा निर्णय घेणार होती. परंतु तो निर्णय थांबविण्यात आला. मात्र आता धरणाच्या पाणी पातळीची स्थिती पाहिल्यानंतर महापालिका पाणी कपातीशिवाय पर्याय राहिलेला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.