प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका “वेन्टीलेटवर’

वारंवार दुरुस्त करूनही रस्त्यात बंद पडण्याच्या प्रकारात वाढ : नागरिकांमध्ये संताप
11 नवीन रुग्णवाहिकांचा प्रस्ताव ; प्रस्ताव पाठवून दीड वर्षे उलटूनही कोणतीही कार्यवाही नाही

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 1 – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील काही रुग्णवाहिका शेवटच्या घटका मोजत असून, सध्या त्या “वेन्टीलेटवर’ आहेत. वारंवार दुरुस्ती करूनही त्या व्यवस्थीत चालत नसल्यामुळे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नवीन रुग्णवाहिका मिळण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. प्रस्ताव पाठवून दीड वर्षे झाली, मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर, दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त असल्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषदे अंतर्गत 96 प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएससी) आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी एक रुग्णवाहिका आहे. परंतु, यातील काही रुग्णवाहिकांचे “लाईफ’ संपत आले आहे. यातील काही वाहने आठ ते नऊ वर्ष जुनी असल्याने ती वारंवार दुरुस्त करूनही रस्त्यात बंद पडत असल्याने याचा रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थिती रुग्णाला वेळेत उपचार देण्यासाठी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालयात दाखल करताना डॉक्‍टर आणि रुग्णवाहिका चालकांची दमछाक होते. त्यामध्ये जिल्ह्यातील 11 ठिकाणच्या रुग्णवाहिका या दुरुस्तच होवू शकत नसल्यामुळे त्याठिकाणी नवीन रुग्णवाहिका देण्याच्या मागणीचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून मुंबई येथील आरोग्य सेवा उपसंचालक आणि परिवहन विभागाचे आरोग्य सेवा उपसंचालक यांना पाठविण्यात आला आहे.

डिसेंबर 2016 आणि जानेवारी 2017 मध्ये याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत राज्य शासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामध्ये भोर तालुक्‍यातील जोगवडी आणि नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र, खेड तालुक्‍यातील कडूस, वाडा आणि वाफगाव केंद्र, वेल्हा तालुक्‍यातील करंजावणे, हवेली तालुक्‍यातील कुंजीरवाडी, इंदापूर तालुक्‍यातील निरवांगी आणि शेळगाव, मावळ तालुक्‍यातील कार्ला तसेच आंबेगाव तालुक्‍यातील लांडेवाडी केंद्रांना रुग्णवाहिकेची अत्यावश्‍यक गरज आहे. तर, अन्य काही केंद्रांतील रुग्णवाहिका जुन्या झाल्या असून, त्याही वारंवार बंद पडत आहेत. असे असताना शासनाकडून होणारी दिरंगाई ही रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.

———————————–
रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नाहीत
रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे ती एकाच जागेवर पडून आहे. रुग्णवाहिकेची गरज भासल्यास दुसरी रुग्णवाहिका बोलवावी लागते. त्यामध्ये बराच वेळ जात असून, त्याचा फटका रुग्णांना बसतो. त्यामुळे रुग्णवाहिका लवकरात लवकर मिळाव्या, जीव गेल्यावर रुग्णवाहिका देणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, नवीन 11 रुग्णवाहिका मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला असून, पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)