पावसाच्या पाण्याने ‘आहार’ भिजला

राजगुरूनगरच्या दहा अंगणवाड्यांचा प्रश्‍न गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित

राजगुरूनगर – शहरातील नगर परिषदेच्या लगत असलेल्या अंगणवाडीमध्ये काल रात्री झालेल्या पावसामुळे पाणी साचले. विद्यार्थ्यांचा पोषण आहार आणि अभ्यासाचे साहित्य भिजले. शहरातील दहा अंगणवाड्यांचा प्रश्‍न गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याकडे जिल्हा परिषद स्थानिक नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याने शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

राजगुरुनगर शहरात दहा अंगणवाड्या असुन त्यामध्ये जवळपास एक हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. अलीकडे इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल असला तरी मराठी शाळेचा पाया असलेल्या अंगणवाडीत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजगुरुनगर ग्रामपंचायत असताना शहरात सात अंगणवाड्या स्थापन करून शिक्षणाची सुविधा सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती; मात्र त्यावेळी या अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यांमध्ये भारत होत्या. आताही अशीच अवस्था आहे. शहरातील सातही अंगणवाड्यांना चांगल्या इमारती नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. राजगुरुनगर नगरपरिषद अस्तित्वात आल्याचे साडेचार वर्षे झाले; मात्र या प्रश्‍नांकडे नगरपरिषद लक्ष देत नाही. तर जिल्हा परिषदेचे एकात्मिक बाल विभाग लक्ष देत नसल्याने विद्यार्थ्यांवर जमिनीवर गळाल्या आणि नादुरुस्त इमारतीत बसण्याची वेळ आली आहे.

राजगुरुनगर नगर परिषदेच्या लगत असलेल्या अंगणवाडीत सुमारे 40 विद्यार्थी आहे. ही अंगणवाडी येथील भाजी बाजारातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीत भरते. पत्रे फुटल्याने या इमारतीतून पाणी खाली गळते, ते वर्गात साचून राहते. रविवारी (दि. 23) झालेल्या जोरदार पावसामुळे अंगणवाडीचे सिमेंट पत्रे फुटून त्यातून सर्व पाणी खोलीत साचले आहे. खोलीतील विद्यार्थ्यांचा आहाराचे सर्व वस्तू भिजल्या आहेत. शैक्षणिक साहित्य भिजले. वर्गात अर्धा ते एक फूट पाणी साचल्याने आज अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली.

नगरपरिषदेच्या जवळ असलेल्या या अंगणवाडीच्या दरवाज्यात दररोज भाजीपाला बाजार भरतो. त्याचा मोठा त्रास या विद्यार्थ्यांना होतो. बाजारातच असलेल्या या अंगणवाडीजवळ दररोज जास्त कचरा साठतो. यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने याचा त्रास विद्यार्थ्यांना होणार आहे. शिवाय या अंगणवाडीच्या रिकामच्या जागेत काही लोक खाजगी साहित्य ठेवत असल्याने त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. तर बाजारात येणारे आणि रात्री या परिसरात फिरणारे नागरिक या अंगणवाडीच्या दरवाज्यात लघुशंका करीत असल्याने मोठी दुर्गंधी सुटत आहे.

अंगणवाडीची झालेली दुरवस्था खेदजनक आहे. फूटभर पाणी अंगणवाडीत साठले आहे. पत्रे फुटले ते दुरुस्त केले जात नाही. साहित्य भिजले आहे. प्राथमिक शिक्षणाची अशी अवस्था असेल तर सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. शाळांची दुरवस्था सुधारण्याची गरज आहे.
-राजेंद्र सुतार, शिक्षण तज्ज्ञ


स्वर्गीय खा. बाळासाहेब आपटे यांच्या निधीतून ही पत्र्याची शाळा बांधण्यात आली आहे; मात्र त्याकडे आता जिल्हा परिषद आणि नगर परिषद लक्ष देत नाही. इमारत नादुरुस्त असल्याने पत्रे फुटल्याने संपूर्ण खोली गळते. आठ-आठ दिवस अंगणवाडी बंद ठेवावी लागते.
– संजय भागवत, पालक


अंगणवाडीला चांगली इमारत मिळावी, अशी मागणी आमच्या विभागासह राजगुरुनगर नगर परिषदेकडे अनेक दिवसांपासून केली आहे. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. अंगणवाडीचे पत्रे फुटल्याने कालच्या पावसात अंगणवाडीत फूटभर पाणी साचले यात सर्व साहित्य भिजले आहे.
– दिपाली खेडकर अंगणवाडी सेविका


शहरातील दहा अंगणवाड्यांमध्ये जवळपास हजार विद्यार्थी आहेत. एकाही अंगणवाडीला इमारत नाही. नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या वादात या अंगणवाड्या अडकल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. आम्ही ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. पत्रव्यवहार केला आहे. त्यावर कारवाई झालेली नाही.
– चंद्रभागा भोमाळे केंद्रप्रमुख


गेली अनेक वर्षांपासून या अंगणवाडीकडे जिल्हा परिषदेचे लक्ष नाही. नगर परिषद आणि जिल्हा परिषदेने लवकर याबाबत निर्णय घेऊन अंगणवाडीला नवी इमारत द्यावी. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.
– मिलिंद आहेर अध्यक्ष लायन्स क्‍लब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)