टोमॅटोचे लिलाव सकाळी नऊपासूनच

नारायणगाव  -जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपकेंद्रात लायसन्स धारक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी टोमॅटो खरेदी विक्रीचे व्यवहार करावेत व टोमॅटोचे लिलाव सकाळी 9 वाजता होणार असल्याची माहिती सभापती ऍड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.

नारायणगाव उपकेंद्रात बाजार समिती व टोमॅटो व्यापारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत टोमॅटो व्यापाऱ्यांकडून टोमॅटोचे बाजार भाव सकाळी एक व दुपारी वेगळे बाजारभाव मिळत असल्याने वेळापत्रक ठरविणे, शेतकऱ्यांना पट्ट्या वेळेत व रोख देणे, मार्केटमधील कामगारांची स्वच्छता, आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी तातडीने बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी सभापती संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक एन. एम. काळे, प्रकाश ताजणे, व्यवस्थापक शरद धोंगडे, रुपेश कवडे, टोमॅटो व्यापारी सारंग घोलप, दगडू पवार, दत्ता शिंगोटे, किसन कुतळ, योगेश घोलप, महेश हांडे, अनिल काशीद, बी. बी. नेहरकर, शुकाट बागवान, रिजवान, शेखलाल, राजू पठाण आदी व्यापारी उपस्थित होते.

सभापती काळे म्हणाले की, येत्या 1 जुलैपासून बाजार समितीच्या आवारात लायसन्सधारक व्यापारीच टोमॅटोची खरेदी करतील. त्यासाठी त्यांना बाजार समितीच्या वतीने ओळखपत्र दिले जाईल. लायसन्स धारक नसणाऱ्या व्यापाऱ्यांनी टोमॅटोची खरेदी- विक्री व्यवहार करू नयेत, अन्यथा अशा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सकाळी नऊ वाजता ठरविलेला बाजारभाव हा दुपारी तीनपर्यंत प्रतवारी नुसार राहील. आवारात बाजारभाव फलक लावण्यात येईल व बाजार समितीचे अधिकृत लायसन्सधारक असलेले व्यापारी यांची नावे व त्यांचे फर्म याची माहिती लावली जाईल. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना बाजार समितीने दिलेली पावती बाजारभाव टाकून देणे गरजेचे आहे.

व्यापाऱ्यांकडील कामगारांना एकसारखे ड्रेस कोड असतील. त्यांची शारीरिक स्वच्छता रोज असणे गरजेचे आहे. तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे रोख देणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना दिलेले चेक बाउन्स होणार नाहीत याची काळजी घ्या, शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. असे महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात लायसन्स धारक व्यापाऱ्यांकडून खरेदी विक्रीचे व्यवहार काटेकोरपणे केले जातील. शेतकरी व बाजार समिती यांचा समन्वय ठेऊन पारदर्शक व्यवहार केले जातील. शेतकऱ्यांच्या मालाला जेष्ठीत जास्त भाव देण्याचा सर्व व्यापारी प्रयत्न करू. बाजार समितीने ठरविलेल्या वेळेत शेतकऱ्यांनी टोमॅटो घेऊन येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक व चुकीचे आर्थिक व्यवहार होणार नाहीत.
– दगडू पवार/सारंग घोलप, टोमॅटो व्यापारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)