नगर – भाजप कार्यकर्त्यांनी पदाच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासाला चालना द्यावी. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केले आहे. त्या योजना तळागाळापर्यत घेवून जा. पुढील मनपाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा स्वबळावर भाजपाची सत्ता मिळविण्यासाठी काम करावे. तसेच पद भेटल्यानंतर कोणीही हवेत जाण्याचे काम करू नये. पदाला साजेचे असे काम समाजा समोर उभे करुन, जनतेचा विश्वास संपादन करावा, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.
मनपाच्या सभागृह नेते पदाचा पदभार मनोज दुलम यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे हस्ते स्विकारला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, महिला बाल कल्याण समितीचे सभापती लता शेळके, नगरसेवक रामदास आंधळे, रवींद्र बारस्कर, माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी, विलास ताठे, उदय कराळे, संजय ढोणे, अजय ढोणे, संजय वल्लाकटी, अभिजीत चिप्पा, राजू मंगलारम आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे म्हणाले, मनपामध्ये भाजपची सत्ता असताना सर्वांना बरोबर घेवून शहर विकासाचे काम सुरू आहे. विकास कामामध्ये आम्ही कधीही पक्षीय राजकारण आणले नाही. सभागृह नेते मनोज दुलम यांना पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांनी यापुढील काळामध्ये असेच काम करावे, असे ते म्हणाले.
गंधे म्हणाले की, सर्व सामान्य कुटुंबातील मनोज दुलम यांना भाजपने सभागृह नेते पदी निवड केली आहे. त्यांनी नेहमीच सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या प्रश्नासाठी धावून जाणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. पद्मशाली समाजालाही पदाच्या माध्यमातून न्याय दिला.सभागृह नेत दुलम म्हणाले, माझ्या सारख्या सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तींला सभागृह नेते पदी विराजमान केलें याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, असे ते म्हणाले.