Bachchu Kadu | Sachin Tendulkar – सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात बंद करावी, अन्यथा भारतरत्न पुरस्कार परत द्यावा, अशी मागणी करत प्रहारचे आमदार बच्चू कडूंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशाप्रकारे तेंडुलकरविरोधात कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
याबाबत बोलतांना ते म्हणाले, ”जो अंगरक्षक सचिन तेंडुलकर यांचे रक्षण करत होता. त्यांना इजा होऊ नये म्हणून काम करत होता. त्यालाच सचिन करत असलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीमुळे जीव गमवावा लागला. हे दुर्दैवी आहे, सचिन तेंडुलकरने याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
तसेच सचिनने भारतरत्न परत करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्याला आम्ही भारतरत्न म्हणून स्वीकारले, त्यांचा गौरव केला. त्यांच्याच अंगरक्षकावर यांच्या जाहिरातीमुळे आत्महत्या करण्याची वेळी येत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. एक तर त्यांनी भारतरत्न परत करावा किंवा त्या गेमिंगची जाहिरात करणे सोडले पाहिजे असे बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली होती. ऑनलाईन रमीच्या व्यसनातून ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. याच प्रकरणावरुन कडू यांनी आक्रमक भूमिका घेत 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यादिनी तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.