खासगी हॉस्पिटलला पुणे पालिकेचा दिलासा

करोनाचे रुग्ण कमी झाल्याने ताब्यातील बेड इतर रुग्णांना वापरण्यास मुभा

पुणे – खासगी रुग्णालयाकडून कोवीड 19च्या रुग्णांसाठी ताब्यात घेतलेले बेड परत करण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरूवात करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांकडे झालेल्या आढावा बैठकीनंतर महापालिकेने 36 रुग्णालयांचे 1382 बेड इतर रुग्णांना वापरण्यास गुरूवारी परवानगी देण्यात आली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

शहरात दि. 9 मार्चला पहीला करोनाबाधित रुग्ण सापडला त्यानंतर आज अखेर शहरात सुमारे 1 लाख 62 हजार रुग्ण आढळून आले आहेत. सुरूवातीच्या काळात रुग्ण संख्या कमी होती. मात्र, जून महिन्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाल्याने महापालिकेने 84 खासगी हॉस्पिटलचे 5 हजार 285 बेड करोना बाधितांच्या उपचारांसाठी ताब्यात घेतले होते.

मात्र, ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर शहरात करोनाबाधितांचा आकडा लक्षणीयरित्या घटला आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमधील बेड रिकामे पडले आहेत. त्यामुळे खासगी हॉस्पिटलकडून ताब्यात घेतलेले बेड करोना वगळता इतर रुग्णांसाठी उपचारास वापरण्याची मुभा महापालिकेने दिली आहे.

याबाबत विभागीय आयुक्तांकडून दोन दिवसांपूर्वी आढावा घेत निर्णय घेतला. महापालिकेने ऑक्‍सिजन तसेच आयसीयू बेड पालिकेकडेच ठेवण्याची भूमिका घेतली होती, त्यास विभागीय आयुक्तांकडूनही सहमती दर्शविण्यात आली होती.

1300 बेड उपलब्ध…
महापालिकेकडून 1382 बेड खासगी रुग्णालयांच्या ताब्यात दिले आहेत. यामध्ये 469 साधे बेड, 737 ऑक्‍सिजन बेड तर 160 आयसीयू बेडचा समावेश आहे. या शिवाय, पुढील दोन आठवड्यात शहरातील रुग्णांची संख्या लक्षात घेऊन उर्वरीत बेड बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.