पिंपरी – गुन्ह्यांच्या जोरावर परिसरात दहशत माजविणाऱ्या ज्ञानेश्वर ऊर्फ ज्ञान्या लांडगे टोळीवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शनिवारी (दि. 22) याबाबतचे आदेश दिले.
ज्ञानेश्वर रामदास लांडगे (वय 28), गणेश तिम्मा धोत्रे (वय 27, दोघे रा. गवळीमाथा, भोसरी), मल्लेश कोळवी (वय 21, रा. चिखली), कृष्णा विक्रम शिंदे (वय 28, रा. आदिनाथनगर, भोसरी) असे मोकाची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडगे टोळीतील चारही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांच्या जोरावर ते परिसरात दहशत माजवत होते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी अलीकडच्या काळात संघटित गुन्हे करण्यास सुरुवात केली होती.
या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या टोळीवर मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला होता. या प्रस्तावास मंजुरी देत अपर पोलीस आयुक्त पोकळे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.