नगर (प्रतिनिधी) – शहरातील गांधी मैदानाजवळील मार्कंडेय मंदिरास १०२ वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर सुस्थित असल्याने त्याचा जीर्णोध्दार न करता समोरील बाजूला चार कोटींचा सभा मंडप बांधला जाणार आहे, अशी माहिती देवस्थानचे माजी अध्यक्ष दत्तात्रय दिकोंडा, श्रीनिवास बोज्जा, गणेश विद्ये, ॲड. राजेंद्र गाली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिकोंडा म्हणाले की, मंदिराचा सभामंडप मोडकळीस आलेला आहे. महापालिकेने हा सभामंडप काढून टाकण्याचे लेखी स्वरूपात देवस्थानला कळविले होते. देवस्थानच्या पदाधिकारी बदलाचा प्रस्ताव धर्मादाय उपायुक्त कार्यालयात दाखल केलेला आहे. सध्या ही प्रक्रिया न्यायप्रविष्ट आहे. समाजातील ५० प्रमुख व्यक्तींनी सभामंडपाचे नुतणीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला.
त्यासाठी प्रत्येकाने एक लाख रूपये देण्याचे ठरविले. तसेच समाजाच्या लोकवर्गणीतून चार कोटी रूपयांचा सभामंडप केला जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून परवानगी घेतली. दाक्षिणात्य पद्धतीचा काळ्या पाषाणातील दगडापासून हा सभामंडप केला जाणार आहे. हे काम दोन वर्ष चालणार आहे.
दि.१० मे रोजी भूमिपूजन केले जाणार आहे. लोकसभा आचारसंहिता सुरू असल्याने कोणत्याही राजकीय नेत्याला निमंत्रित केले नाही. विविध आश्रमांच्या प्रमुखांना बोलविले जाईल. त्यासाठी तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संपूर्ण समाजाचा हा कार्यक्रम आहे.
आम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात महत्वाच्या पदावर काम करत आहोत. आम्हाला कोणत्याही पदाची लालसा नाही. काही विघ्नसंतोषी व्यक्ती या कामाच अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी अनेक वर्ष विविध संस्थांच्या कामकाजात अडथळा आणण्याचाच प्रयत्न केला आहे.