निर्णय मागे न घेतल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा
पुणे – “नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केलेल्या बाजीराव रस्त्यावरील सारसबाग ते मित्रमंडळ चौकादरम्यानच्या पदपथावर उभारण्यात आलेल्या स्टॉलविरोधात परिसरातील व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पदपथांवर बाहेरील व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय 48 तासांत मागे न घेतल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा स्थानिक व्यावसायिकांनी दिला आहे.
स्वारगेट परिसरात मेट्रो स्टेशन आणि ट्रान्झिट हबचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी स्वारगेट परिसरातील 44 स्टॉल्स धारकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या स्टॉल धारकांचे मित्रमंडळ चौकातील पाटील प्लाझासमोर पदपथ आणि सणस मैदानाजवळील छ. शिवाजी उद्यानाजवळील पदपथावर पुनर्वसन करण्यात येत आहे. यासाठी पदपथावर स्टॉल्स उभे करण्यात आले आहेत. दरम्यान, या पुनर्वसनास पाटील प्लाझा आणि परिसरातील व्यावसायिकांनी विरोध दर्शविला आहे.
बाजीराव रस्त्यावरील सारसबाग ते मित्रमंडळ चौकादरम्यानचा रस्ता महापालिकेने “नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केला आहे. या रस्त्यावरील पाटील प्लाझासमोरील पदपथावर बेकायदेशीरपणे स्टॉल्स आणून ठेवले आहेत. हे स्टॉल्स सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ ठेवण्यात येणार होते. परंतु, तेथे विरोध झाल्यानंतर याठिकाणी हलविण्यात आले आहे. हे पुनर्वसन स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे याला आमचा विरोध असून, हे स्टॉल्स दोन दिवसांत हलविण्यात यावेत, यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यावसायिक अंकुश भोसले यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच, येथील पुनर्वसनाचा निर्णय मागे न घेतल्यास रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा भोसले यांनी दिला आहे. तसेच, महापालिकेच्या अधिकाऱ्याने आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. यावेळी डॉ. प्रशांत कर्णिक, रमेश शेट्टी, नूतन चव्हाण, संदीप जोशी, प्रशांत तुणगे, समीर चितापुरे, मनिषा शहा, प्रकाश शहा आदी व्यावसायिक उपस्थित होते.