मुंबई – मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात लहान मुलांसाठीच्या लसीच्या चाचणी प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला आहे. झायडस कॅडिलाने नायर रुग्णालयाला लस चाचणीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या चाचणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.
या लस चाचणीसाठी आज दोन मुलांची नोंद करण्यात आली आहे. या चाचणीत एकूण 50 मुलांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांवर ही चाचणी करण्यात येणार आहे.
झायडस कॅडिला कंपनीची झायको-डी ही लस लहान मुलांना दिली जाणार आहे. एकूण तीन डोस लहान मुलांना दिले जाणार आहेत. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस 28 व्या तर तिसरा डोस 56 व्या दिवशी दिला जाईल, असे नायरचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.
ज्या मुलांना सहव्याधी नाही आणि त्यांच्यात अँटिबॉडीज नाहीत, अशा मुलांना या चाचणीत सहभाग दिला जातो आहे. लस चाचणीत सहभागी होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना पाठवावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट याच महिन्यात लहान मुलांवरील कोव्होवॅक्सची क्लिनीकल चाचणी सुरु करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अमेरीकेतील नोव्हाव्हॅक्स कंपनीने कोव्होवॅक्स ही कोव्हिडवरील लस तयार केली आहे.
सप्टेंबर महिन्यात 18 वर्षांवरील वयोगटासाठीही कोव्होवॅक्स लस बाजारात आणण्याची तयारी सीरम करत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नोव्हाव्हॅक्सने सीरम इन्स्टिट्यूटसोबत या लसीसाठी उत्पादन करार करण्याची घोषणा केली होती. ही लस करोनाच्या वेगवेगळ्या व्हेरीएंटवर प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे.