मेक्सिको सिटी – जर्मनीचा स्टार टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेव याने येथे सुरू असलेल्या मेक्सिकन ओपन टेनिस स्पर्धेत पंचांना शिवागाळ केली तसेच आपली रॅकेटही त्यांच्याच खुर्चीवर आपटून मोडली. त्याच्या याच गैरवर्तनामुळे त्याची या स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पुरुष दुहेरीचा सामना गमावल्यानंतर ज्वेरेवने आपला राग पंचांच्या खुर्चीवर काढला व त्यांना उद्देशून अपशब्दही काढले. त्याच्या या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत त्याला स्पर्धेतून बाहेर काढले गेले आहे. ज्वेरेव ब्राझीलचा सहकारी खेळाडू मार्केलो मेलोसह पुरुष दुहेरीच्या सामन्यात खेळत होता. त्यांचा सामना लॉईड ग्लासपूल आणि हॅरी हेलीओव्हारा यांच्याशी सुरू होता.
ज्वेरेव व मार्केलो जोडीला हा सामना 6-2, 4-6 (10-6) असा गमावावा लागला. या सामन्यात ज्वेरेवचा खेळ फारसा चांगला झाला नाही म्हणून तो संतापला होता व त्याच रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. या सामन्यात टायब्रेकमध्ये पंचांनी दिलेले निर्णय न पटल्याने त्याने गैरवर्तन केले.