शिरूर तालुक्यातील स्थिती ः शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार?
शिरूर – शिरूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 1152 शिक्षक मजूर आहेत. त्यापैकी 1124 कार्यरत आहेत. 28 शिक्षक पदे रिक्त आहेत. शिरूर तालुक्यातील शिक्षकांवर पर्यवेक्षिकाचे काम करणारे एकूण पंचवीस केंद्रप्रमुख आहेत. यापैकी सतरा केंद्रप्रमुख कार्यरत आहेत, तर आठ केंद्रप्रमुखांच्या जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्याच्या शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार हा यक्ष प्रश्नच आहे.
कारेगाव, तळेगाव नंबर 2, इनामगाव, कवठे यमाई, न्हावरे, आंबळे, वडगाव रासाई, मांडवगण फराटा या केंद्रांवरील केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. तर, कारेगाव, रांजणगाव गणपती, भीमाशेत, डालभाग, वेगरे पुनर्वसन, कोयाळी पुनर्वसन, शिक्रापूर, कोरेगाव भीमा ,वसेवाडी, सणसवाडी, झोडक, थापेवाडी, थिटेमळा, ढगेवाडी, तुळशीबाबानगर, हुलगुंडे वस्ती, बेंद्रेनगर, चौधरीनगर, पठारेवस्ती, वराळे वस्ती या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
शिरूर ग्रामीण, कारेगाव, ढोकसांगवी, सोनेसांगवी, भांबर्डे, कोंढापुरी, वाघाळे, टाकळी भीमा, कोरेगाव भीमा, सणसवाडी, 954 वाडा पुनर्वसन, ढेरंगे वस्ती, निमगाव म्हाळुंगी, शिक्रापूर, कोयाळी पुनर्वसन, पिंपळे खालसा, हिवरे कुंभार, जातेगाव खुर्द, धामारी, कवठे यमाई, निमगावभोगी, न्हावरे, आंबळे, कुरुळी, सादलगाव, शिंदोडी, आणि मांडवगण फराटा या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद रिक्त आहेत. रिक्त पदे भरलेली नसल्याने इतर शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडला आहे.
शिरूर तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या जागा लवकरच भरल्या जातील. जागांच्या पदोन्नतीचा प्रश्न शेवटच्या टप्प्यात आहे. इतर जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार झालेला आहे, तर विस्ताराधिकारी पदाची भरती न झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे.
राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी
जिल्हा परिषद शाळेचा कारभार अनेक दिवसांपासून मनमानी सुरू आहे. पंचायत समिती गट विकास अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांना कसलेच सोयरसूतक नाही.
बाळासाहेब घाडगे, प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी संघटनाजिल्हा परिषद शाळांतील मुख्याध्यापक असो शिक्षक असो किंवा विस्ताराधिकारी असो या जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यायला हवा होता, परंतु याबाबत ठोस कार्यवाही झालेली नाही.
संजय पाचंगे, अध्यक्ष क्रांतिवीर संघटना