संतोष पवार
सातारा – शाहूपुरी ग्रामपंचायतीचा विस्तार वाढला, मात्र त्या तुलनेत या भागात मुलभूत सुविधा नागरिकांना मिळताना दिसत नाही. ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य आहे. अनेक वसाहती डोंगरालगत असून अंधाराचा फायदा घेवून या भागात गुन्हेगारी वाढत आहे. आज अनेक शहरे सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली येत असताना शाहूपुरीतील सीसीटीव्ही संकल्पनेला मात्र मुहुर्त सापडत नाही. परिणामी शाहुपुरीकरांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत व विविध सामाजिक संघटनांनी याकामी पुढाकार घेवून पोलीस यंत्रणेला मदतीचा हात देण्याची गरज आहे.
सातारा शहरालगत असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे 40 हजार आहे. दिवसेंदिवस या ग्रामपंचायतीचा विस्तार वाढत आहे. या परिसरात सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे अने माजी आमदार, पदाधिकारी, विचारवंत, लेखक या भागात वास्तव्यास आहेत. अनेक वसाहती नव्याने निर्माण होत असल्याने स्ट्रीट लाईट अभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. 40 हजार लोकसंख्येच्या संरक्षणाची जबाबदारी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील 70 ते 80 पोलिस कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांच्यावतीने ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, बॅंका, व्यवसायिक यांना सीसीटीव्ही बसवण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले आहे. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचेच यातून दिसत आहे.
अनेक ग्रामपंचायतींनी सीसीटीव्हीसाठी पुढाकार घेतला आहे. अगदी लहान – सहान ग्रामपंचायती पण त्यामध्ये मागे नाहीत मात्र शाहूपुरी ग्रामपंचायतीने याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. परिणामी शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत धुमस्टाईलने दागिने हिसकावणे, महिला, मुलींची छेडछाड करणे, मारामारी, घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत.
सीसीटीव्ही यंत्रणा मुख्य चौकांमध्ये, महत्वाच्या रस्त्यांवर बसवली तर गुन्हेगारीवर नियंत्रण येऊ शकते. मात्र यासाठी ना ग्रामपंचायत पुढाकार घेतेय ना सामाजिक संघटना. त्यामुळे शाहुपुरीकर सध्या असुरक्षिततेचे जीवन जगत आहेत. शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत शाहूपुरी चौक आणि मोळाचा ओढा या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र सुरु असतील अशी तिळमात्र शक्यता नाही. शाहूपुरी चौकातील सीसीटीव्ही तर लोंबकळताना अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी शाहूपुरीकरांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
सदस्यांनी एकजुटीने घ्यावा पुढाकार
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत सहा प्रभागात 17 सदस्य आहेत. सदस्यांनी शाहूपुरीकरांच्या सुरक्षिततेसाठी एकजूट दाखवून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी आग्रही भुमिका घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून टप्प्या टप्प्याने सीसीटीव्ही साठी निधीची तरतूद करण्याची गरज आहे. याशिवाय खासदार फंड, आमदार फंड, डीपीसीच्या माध्यमातून निधीची तरतूद होऊ शकते. मात्र त्यासाठी एकजुटीने पाठपुरावा करण्याची मानसिकता सर्वांनीच दाखवण्याची गरज आहे.
पोलिसांच्या पत्राला केराची टोपली
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्यावतीने शाहूपुरी ग्रामपंचायतीला महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत पत्राद्वारे कळवण्यात आले होते. मात्र या पत्रावर काहीही कारवाई झाली नसल्याची माहिती पोलिस विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचे ग्रामपंचायतीला काही देणे – घेणे नाही का? असा प्रश्नही निर्माण होत आहे. शाहूपुरी चौक आणि मोळाचा ओढा येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही शेवटच्या घटका मोजत आहे. हे सीसीटीव्ही म्हणजे शोपीस बनले असून कोणत्याही क्षणी खाली कोसळण्याची शक्यता आहे.