अकोले -शिक्षकांचे समाजासोबतचे नाते दुरावल्याचे एकीकडे बोलले जात असताना अकोले तालुक्यात मात्र त्याच्या उलट चित्र निर्माण झाले आहे. निवडक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांनी करोनाच्या आपत्तीत जी पावले उचलली, ती कौतुक पात्र ठरली आहेत. या कृतीची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या शिक्षकांकडून दिला गेलेला समाजशिक्षणाचा हा अस्सल धडा ठरावा!
लॉकडाऊनच्या काळात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांचे हाल सुरू आहेत. परप्रांतीय मजूर, धुणीभांडी करणाऱ्या महिला, शेतमजूरांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने परिस्थिती फार हलाखीची झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात संबंधितांची उपासमार होऊ नये म्हणून अकोले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी दीड लाख रुपये जमा करुन गरजूंना धान्य आणि किराणा सामान घरपोच केले. त्यामुळे गरीबांची चूल पेटू शकली अन्यथा त्यांच्यावर उपासमाची वेळ आली होती.
आपल्या सामूहिक कृतीतून या संदर्भात समाज शिक्षणाचा हा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. शाळा बंद असल्याने शक्य तेथे मुलांना ऑनलाईन अभ्यास देण्यासारखे उपक्रम सुरू आहेत. अशा शैक्षणिक उपक्रमांच्या अनुषंगाने व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना शक्य तितकी मदत करण्याचा निर्णय घेतला.
गरजूंना धान्य आणि किराणा सामान देण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. पहिल्याच दिवशी एक लाख रुपये जमा झाले. दुसऱ्या दिवशी आणखी पन्नास हजार. काही शिक्षकांनी घरचे गहू, बाजरी दिली. प्रशासनाच्या परवानगीनंतर आवश्यक ते सामान विविध किराणा दुकानांमधून खरेदी करण्यात आला. गहू किंवा गव्हाचे पीठ, तांदूळ, तीन प्रकारच्या डाळी, मठ, बेसनपीठ, मीठ, खाद्यतेल, साखर, चहापावडर, मसाले, साबण असे सामान असलेल्या किट्स गरजूंच्या घरांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.किट्स तयार करण्यासाठी दुकानदारांकडे लोक नसल्याने शिक्षकांनी मदत केली. हे सगळं करताना सोशल डिस्टन्सिंग आणि करोनासंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ दिले नाही. साधारणत: शिक्षक यात सहभागी झाले असून, त्यापैकी सुमारे तीस पस्तीस महिला शिक्षक आहेत.