जिल्हा परिषदेच्या 54 अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेश

सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अनुकंपा तत्त्वावरील 54 उमेदवारांना गुरुवारी नियुक्ती आदेश देण्यात आले. लॉकडाऊनमुळे नियुक्तीचे आदेश संबंधितांना ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेतील अनुकंपा तत्त्वावरील भरती गेल्या पाच वर्षे रखडली होती. याबाबत सदस्यांनी अनेकदा जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये आवाज उठवला होता.

अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची मागणी लवकरच पूर्ण करू, असे आश्‍वासन माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिले होते. अध्यक्ष उदय कबुले यांनीही हा विषय लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनोज जाधव यांनी पुढाकार घेतला. अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया किचकट असल्याने बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास करून कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली.

विविध विभागांमधील 80 उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीप्रमाणे संभाव्य यादी जाहीर करण्यात आली होती. या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी आल्या होत्या. मात्र, मनोज जाधव व अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासून आणि इच्छुकांशी संवाद साधून हा विषय मार्गी लावला. संजय भागवत यांच्या सहीने 54 उमेदवारांना गुरुवारी ईमेलद्वारे नियुक्तीपत्रे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये 29 आरोग्य सेवक, नऊ कंत्राटी ग्रामसेवक, सात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, चार अंगणवाडी पर्यवेक्षक, दोन वरिष्ठ सहाय्यक आणि प्रत्येकी एक कनिष्ठ अभियंता, औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक या पदांचा यामध्ये समावेश आहे.

फसवणूक करणाऱ्या सात जणांवर होणार कारवाई
अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी 80 उमेदवारांची संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. या उमेदवारांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांची छाननी केल्यावर सात जणांनी शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. तिसरे अपत्य असताना माहिती लपवणे, खोटी कागदपत्रे सादर करणे, असे प्रकार झाले होते. त्यामुळे संजय भागवत यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्यांची समाधानकारक उत्तरे न आल्याने संबंधितांवर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.