योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवू ः घुले, शेळके
नगर – जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 24 व्या अध्यक्षा म्हणून राजश्री घुले यांनी आज शुक्रवार 3 जानेवारी अध्यक्षपदाचा पदभार हाती घेतला.दरम्यान नुतन उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनीही सुत्रे हाती घेवून कामाला सुरवात केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करू असे अध्यक्ष घुले व उपाध्यक्ष शेळके यांनी सांगितले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी पुन्हा एका महिलेच्या हाती ग्रामीण विकासाची गंगोत्री समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात आजचा दिवस अविस्मरणीय ठरला. लोकल बोर्डानंतर झेडपी अस्तित्वात आली. आज पर्यत 23 अध्यक्षांनी कारभार पाहिला. दरम्यान दोन-तीन वेळा प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. आता 24 व्या महिला अध्यक्षा म्हणून जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा राजश्री घुले त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी पदभार स्विकारला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अति.मुख्य कार्यकारी जगन्नाथ भोर, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे, अर्थ व बांधकाम सभापती कैलास वाकचौरे, कॉग्रेसचे गटनेते तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे गटनेते सुनिल गडाख,समाज कल्याण सभापती उमेश परहर, सदस्य रामहरी कातोरे, माधवराव लामखडे,नगर पं.स सभापती रामदास भोर ऍड. शारदा लगड आदीसह अधिकारी व विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
दरम्यान,जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड मंगळवारी,दि.7 होणार आहे. महाविकास आघाडीतील चारही पक्षांना एक-एक समिती दिली जाणार असून त्याची निवड मुंबईत वरिष्ठ घेणार आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी,कॉंग्रेस,शिवसेना व क्रांतीकारी शेतकरी पक्ष या चार पक्षांनी एकत्र येवून महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली जिल्हा परिषदेची सत्ता मिळविली. गणित जुळत नसल्याने भाजप व विखे गटाने या निवडणुकीतून माघार घेतली होती.