हुंडेकरी अपहरण प्रकरणी उलटसुलट चर्चा
नगर – शहरातील हुंडेकरी उद्योग समूहाचे संचालक व उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांना पिस्तुलाचा धाक दाखवून 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. वेळीच पोलिसांच्या मदतीने त्यांची सुटका झाली. त्यातील दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत. मात्र, घटना घडून तब्बल दिड महिना उलटला तरी त्यातील मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख अद्यापही मोकाट आहे. विशेष म्हणजे सुटका झाल्यानंतर हुंडेकरी यांनी पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले. मात्र,त्यानंतर हुंडेकरी यांना अजहरकडून धमकीचे फोन आल्यानंतरही अजूनही तो मोकाट आहे. त्यामुळे या अपहरण प्रकरणाची आता शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.
हुंडेकरी उद्योग समूहाचे संचालक करीमभाई हुंडेकरी यांचे 18 नोव्हेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास फकीर गल्ली येथून पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले होते. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत आरोपींचा पाठलाग केला होता. त्यामुळे आरोपींनी हुंडेकरी यांना जालना येथे सोडून दिले होते. मात्र, हुंडेकरी यांचे अपहरण कोणी व कशासाठी केले? याबाबत पोलिसांनी मौन पाळले होते. त्यानंतर आरोपींनी 25 लाख रुपये देण्याच्या बोलीवर हुंडेकरी यांना अपहरणकर्त्यांनी सोडले असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत हुंडेकरी व त्यांचे शिष्टमंडळ यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट घेवून, अपहरण करणाऱ्या मुख्य आरोपीस गजाआड करावे अशी मागणीही केली होती. मात्र, पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे लंडन येथे उच्च शिक्षणासाठी गेल्याने अपहरणाच्या घटनेकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून तब्बल 46 दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
हुंडेकरी यांची अपहरण कर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केल्यामुळे हुंडेकरी यांच्या शिष्टमंडळांकडून पोलीस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला होता. तसेच हुंडेकरी यांना व त्यांच्या परिवाराला धोका असल्याने लवकरात लवकर मुख्य आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात असे झाले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अपहरण करणाऱ्या दोघांना जालना येथून ताब्यात घेतले. मात्र, यातील मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख, रा. फकीर गल्ली, नगर) हा अद्यापही फरार आहे. त्याच्या मुसक्या पोलीस प्रशासन कधी आवळणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील हे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
अजहर बदलतोय चार तासात लोकेशन
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हुंडेकरी अपहरणातील आरोपी अजहर शेख याला पकडण्यासाठी गेलेल्या पथकाच्या हातावर तो तुरी देत आहे. पोलिसांना मिळालेल्या लोकेशनची तपासणी केली असता तो तेथून पळ काढत असून चार तासाला लोकेशन बदलत आहे. अजहर हा अट्टल गुन्हेगार असल्याने त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.