बेलसर – महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण बेलसर (ता. पुरंदर)मध्ये आढळल्याने अनेक सामाजिक संस्था त्याचबरोबर आरोग्य विभाग सतर्कतेने काम करीत आहे. झिका विषाणूला घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे.
एडीस एजिप्ती डासांच्या दंशामुळे हा विषाणू पसरतो. मागील काही दिवस “झिका’ची चर्चा राष्ट्रीय स्तरावर होत आहे. त्यामुळे केंद्रीय पथकही गुरुवारी (दि. 4) बेलसरमध्ये दाखल होत आहेत.
ग्रामपंचायत बेलसर यांच्यातर्फे बेलसरमध्ये बॅनरच्या माध्यमातून जनजागृती मोहीम केली जात आहे. त्याचबरोबर माहितीपत्रके आशावर्कर्स आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी पोहोचवली जात आहेत. गावठाण वाड्यावर त्यासोबतच इतर भागातही सर्वेक्षण केले जात आहे.
परंतु सर्वेक्षणामध्ये अळ्या (लारवा) चे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाकडून केले जात आहे. पुरंदर तालुक्याचे गट विकास अधिकारी अमर माने यांनी बेलसर गावची परिस्थिती जाणून घेतली.
गावामध्ये कशाप्रकारे सर्वेक्षण चालू आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीने येणाऱ्या अडीअडचणी समजून त्यांनी त्यावर तोडगा काढला आणि बेलसर मधील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आम्ही पुरेपूर मदत करीत आहोत याची माहिती दिली.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावोगावी चौकांमध्ये बॅनर लावले आहेत त्याच बरोबर शौचालयाच्या पाइपला जाळ्या बसवले आहेत, अशी माहिती सुभाष लिंबरकर यांनी दिली.
भारतीय जैन संघटना बेलसर मधील सद्यपरिस्थितीच्या सर्वेक्षणासाठी गावात रुजू झाली आहे.
त्यांनी बेलसरमधील गावठाण आणि परिसरातील सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता. संस्थेमार्फत सर्वेक्षणांमध्ये एकूण 638 व्यक्तींच्या घरातील माहिती सर्वेक्षणा अंतर्गत जमा करण्यात आले. अजय बायोटेक या कंपनीने ग्रामपंचायतीला दहा किलो पाण्याच्या टाकीमध्ये लारवा मारण्यासाठी औषध भेट म्हणून दिले आहे.