पुणे – कागदपत्रांचा निपटारा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेत आता येत्या जानेवारीपासून पुन्हा “झीरो पेन्डसी’ची मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासने दिली. येत्या 1 ते 15 जानेवारीदरम्यान ही मोहीम राबविणार आहे. त्यामुळे आता प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कायर्कारी अधिकारी सुरज मांढरे यांनी 2016 मध्ये झीरो पेन्डसीचा प्रकल्प राबविला होता. त्याला जिल्हा परिषदेतील कर्मचारी, अधिकारी तसेच जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या मोहिमेनंतर जिल्हा परिषदेतील अनेक वर्षांपासूनची प्रलंबीत प्रकरणे निकाली काढली होती. तसेच, हजारो किलो कागदपत्रांची अनावश्यक रद्दीही काढली होती.
प्रशासकीय व जनतेची कामे वेळेत होण्यासाठी आणि प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार “झिरो पेंडन्सी’चा प्रकल्प पुन्हा जिल्हा परिषद मुख्यालयात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग, पंचायत समिती आणि सर्व क्षेत्रीय कायार्लायांमध्ये येत्या 1 जानेवारीपासून झिरो पेन्ड्न्सी मोहीम राबविण्यासाठी पंचसुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे
. ही मोहीम 15 जानेवारीपर्यंत राबविण्यात येईल. यासाठी समन्वयक अधिकारी म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यावर जबाबदारी सोपविल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.