हॅमिल्टन – फवाद आलमच्या शतकी खेळीनंतरही पाकिस्तानला यजमान न्यूझीलंडकडून 101 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली.
मंगळवारच्या 3 बाद 71 धावांवरून पुढे खेळ सुरू केल्यावर आलमने दमदार शतकी खेळी केली. त्याला सुरेख साथ देताना महंमज रिझवानने 60 धावांची खेळी केली. मात्र, त्यांच्या अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
त्यांचा डाव 271 धावांवर संपला व न्यूझीलंडने हा सामना 101 धावांनी जिंकला. न्यूझीलंडकडून टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, नेल वॅगनर, मिचेल सॅन्टनर व काएल जेमिसन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड पहिला डाव – 431. पाकिस्तान पहिला डाव – 239. न्यूझीलंड दुसरा डाव – 5 बाद 180 घोषित. पाकिस्तान दुसरा डाव – 123.3 षटकांत सर्वबाद 271 धावा. (फवाद आलम 102, महंमद रिझवान 60, टीम साऊदी2-33, काएल जेमिसन2-35, मिचेल सॅन्टनर 2-52, नेल वॅगनर 2-55, ट्रेन्ट बोल्ट 2-72).