पुणे – शहराच्या पूर्वभागाची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भामा-आसखेड योजनेचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि.1) जानेवारी रोजी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम महापालिकेच्या नवीन इमारतीमधील सभागृहात सायंकाळी 4 वाजता होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यावेळी उपस्थित होते.
महापौर म्हणाले की, या योजनेमुळे शहराच्या पूर्वभागाची पाणी समस्या सुटणार आहे. महापालिकेसाठी वर्षाला 2.67 टीएमसी पाणी मिळणार आहे. या पाण्यामुळे लष्कर जलकेंद्रावर तेथील परिसरास पाणी पुरवठ्यासाठी येणारा ताण कमी होणार आहे. तसेच, या योजनेतून तब्बल 12 लाख नागरिकांना पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आणि करोनाची स्थिती लक्षात घेऊन हा कार्यक्रम महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार असून तो नगरसेवक तसेच निमंत्रितांसाठीच असणार आहे.