नवी दिल्ली – करोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाने पसरलेल्या कोविड19 च्या साथीमुळे देशभर लॉकडाऊन जारी झाला होता. त्यामुळे विशेषत: लहान व्यावसायिकांचे मोठे हाल झाले. अशातच दक्षिण दिल्लीच्या मालवीयनगरमधील 80 वर्षीय कान्ता प्रसाद यांच्या “बाबा का ढाबा’लाही आर्थिक फटका बसला. ढाब्यावरच उपजिविका असलेल्या प्रसाद यांच्या हलाखीचे वर्णन करणारा एक व्हिडीओ युट्युब ब्लॉगर गौरव वासन यांनी तयार केला आणि तो व्हिडीओ समाजमाध्यमांत वेगाने पसरला. या व्हिडीओमध्ये कान्ता प्रसाद यांना उपजिविकेसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
सदर व्हिडीओ व्हायरल होताच, अनेक नागरिकांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली. म्हणून नागरिकांनी वासन यांच्याशी संपर्क साधला असता, वासन यांनी आपला स्वत:चा आणि अन्य काही नातेवाईक, मित्र यांचे बॅंकखाते नंबर्स दिले. त्यानुसार वासन यांच्यावर विश्वास ठेवत, नागरिकांनी आर्थिक मदत पाठवली. जमा झालेल्या मदतीपैकी दोन हप्त्यांत वासन यांनी कान्ता प्रसाद यांना सुमारे 2 लाख 33 हजार रुपये दिले. मात्र, प्रसाद यांना मिळालेल्या माहितीनुसार, वासन आणि मित्र व नातेवाईक यांच्या बॅंक खात्यात मिळून लक्षावधी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, वासन यांनी अल्पशी रक्कम आपल्याला देऊन, तोंडाला पाने पुसत, प्रत्यक्षात स्वत:च जास्त पैसे लाटले आहेत. त्यामुळे प्रसाद यांनी वासन याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
वास्तविक हे मदतीचे पैसे आपल्या बॅंक खात्यात यायला हवे होते. मात्र, आपले बॅंक खाते नसल्याचे खोटेच सांगून वासन याने स्वत:चे आणि इतरांचे बॅंक खाते नंबर्स दिले आणि मदत करणाऱ्या सहृदय नागरिकांनाही फसवले, असा आरोप कान्ता प्रसाद यांनी केला आहे. वस्तविक माझे स्वत:चे बॅंक खाते असताना, त्याने स्वत:चे आणि इतर खाते नंबर्स का दिले, याचा शोध पोलिसांनी घ्यावा आणि नक्की किती रक्कम गोळा झाली आहे, त्याची चौकशी करावी, अशी मागणी या वृद्ध व्यावसायिकाने पोलिसांकडे केली आहे.
दुसरीकडे, वासन याने आपल्यावरील आरोप फेटाळताना म्हटले आहे की, मी मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रसाद यांना मदत केली. त्याचा ते गैरफायदा घेत असून, त्यांना हाव सुटली आहे. मी माझ्या बॅंक खात्याचा तपशील पोलिसांना दाखवला असून, माझी बाजूही मांडली आहे. मात्र, वासन यांनी ऑक्टोबर महिन्यातील तीन ते चार दिवसांत जमा झालेल्या रकमेचा तपशील पोलिसांना दिला असून, त्याव्यतिरिक्त महिनाभरात त्याच्या खात्यात जमा झालेल्या आणि मित्र-नातेवाईकांच्या खात्यात जमा झालेल्या मदतीच्या रकमेविषयी तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने या फसव्या ब्लॉगरचा चेहरा उघड झाल्याचे मानले जात आहे.