GOOD NEWS… ‘बाबा का ढाबा’ फूड ब्लॉगर गौरवने केले माफ

दिल्लीच्या ‘बाबा का ढाबा’ला रातोरात प्रसिद्ध करणाऱ्या फूड ब्लॉगरने वृद्ध जोडप्याशी असलेल्या सर्व तक्रारी विसरून एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी माफी मागितल्यानंतर फूड ब्लॉगर गौरव वासन याने वृद्ध दांपत्यासोबतचा हा फोटो पोस्ट केला आहे.

हा फोटो पोस्ट करत गौरव वासनने ट्विट केले की, “शेवट चांगला तर सर्व काही ठीक आहे.” यापूर्वी दुसर्‍या एका फूड ब्लॉगरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कांता प्रसाद हातात जोडून बोलले होते की, “गौरव वासन चोर नव्हता, आम्ही त्याला कधीही चोर म्हटले नाही.

गेल्या वर्षी ‘बाबा का ढाबा’ खूप चर्चेत आला होता, जेव्हा ब्लॉगर गौरव वासनवर ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी दान केलेले पैसे चोरल्याचा आरोप केला होता.

नुकताच दिल्लीतील मालवीय नगरमधील ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कांता प्रसाद हात जोडून YouTuber गौरव वासनची माफी मागत होते.

व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, ‘गौरव वासन, तो मुलगा कधीही चोर नव्हता आणि आम्ही त्याला कधीही चोर म्हटले नाही. आमच्याकडूनच चूक झाली. आम्ही याबद्दल दिलगीर आहोत आणि जनतेला सांगू इच्छितो की, जर आमची काही चूक झाली असेल, तर आम्हाला माफ करा.. यापलीकडे आम्ही तुम्हाला काहीही बोलू शकत नाही.

गेल्या 1 वर्षात ‘बाबा का ढाबा’ चालवणाऱ्या कांता प्रसाद खूप चर्चेत आले होते. सोशल मीडियाच्या मदतीने बाबा रातोरात लक्षाधीश झाले आणि त्यांचा रस्त्यावरचा ‘बाबा का धाबा’ रेस्टॉरंटमध्ये शिफ्ट झाला. पण लॉकडाऊनच्या फाटक्यामुळे आता बाब पुन्हा आपल्या रस्त्यावरच्या ढाब्यावर परत आले आहेत.

कांता प्रसाद यांना तब्बल 45 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. याच पैशातून कांता प्रसाद यांनी नवीन रेस्टॉरंट सुरु केले होते. त्याचा महिन्याचा खर्च साधारण लाखभर रुपयांचा होता. मात्र, लॉकडाऊनमुळे इतर हॉटेल व्यावसायिकांप्रमाणे त्यांचेही कंबरडे मोडले. त्यांच्या या नव्या रेस्टॉरंटचे महिन्याचे भाडे 35 हजार इतके होते.

हॉटेलमध्ये लागणारे सामान, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्च मिळून साधारण लाखभर रुपये लागत होते. त्या तुलनेत कांता प्रसाद यांना रेस्टॉरंटमधून 30 ते 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. त्यामुळे कांता प्रसाद यांनी हे रेस्टॉरंट बंद करुन आपल्या जुन्या जागेतच व्यवसाय सुरु केला आहे.

YouTuber गौरव वासनने सर्वप्रथम कांता प्रसाद यांच्या वेदना सर्वांसमोर मांडल्या होत्या. रडणाऱ्या बाबांचे नशिब रातोरात बदलले. देश आणि जगाभरातून लाखो रुपये त्यांच्या मदतीसाठी जमू लागले. पण बाबा आणि गौरव यांच्यात जो पैशांचा व्यवहार झाला, त्याच्या वादाने पोलीस स्टेशन गाठले.

आता एक वर्षानंतर बाबांना सर्व काही विसरायचे आहे. बाबांनी स्पष्टपणे सांगितले की, गौरवबद्दल आपल्याला कोणतीही तक्रार नाही आणि आज आमच्याकडे जे काही आहे ते केवळ गौरवमुळे आहे. बाबा म्हणाले की, गौरव जेव्हा पाहिजे तेव्हा, येथे येऊ शकतो आणि त्याचे आधीप्रमाणेच जोरदार स्वागत केले जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.