नेवासा – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील युवकास पोलिस ठाण्यात बोलावून पोलिसांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, गणेशवाडी येथील रहिवाशी राजेंद्र रायभान मोहिते यांस समज देण्याच्या नावाखाली सोनई पोलीस ठाण्यात बोलावून बेकायदेशीररित्या न्यालयाचे समन्स आदेश वाॅंरट नसताना सोनई पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या युवकास बेदम मारहाण केली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत युवक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असुन त्याची परिस्थिती गंभीर आहे.
सोनई पोलिसांच्या या प्रतापाबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच या घटनेची माहीती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व नाशिक विभागाचे पोलीस महानिरिक्षक यांना देण्यात आलेली आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन दोषी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास उपोषण व मोर्चा र्काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
सोनई परिसरात अवैध धंदे, वाढती वाळुतस्करी, चोऱ्या घरफोड्या होत असतांना या घटनेचा तपास करण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे. अशात एका तरूणाला विनाकारण बेदम मारहान करण्यात आली.
जखमी युवकाच्या भाऊ अजय मोहिते यांनी सांगितले की, समज देण्याच्या नावाखाली रात्री सोनई पोलीसांनी घरी येऊन राजेंद्र मोहिते यांच्या परिवारास धमकावले. राजेंद्र मोहिते यास पोलिस स्टेशनला नेऊन अमानुषपणे मारहाण केली.संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषण करणार आहे.
सोनई पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल म्हणाले, आम्ही मोहीतेला कुठल्याही प्रकारे मारहाण केलेली नाही वाद नको या कारणासाठी त्याला आम्ही पोलीस स्टेशनला आणलेले होते.