डेहराडून –देशभरात विस्तारण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आम आदमी पक्षाला (आप) बुधवारी उत्तराखंडमध्ये मोठा राजकीय हादरा बसला. त्या राज्यातील दोन बड्या नेत्यांनी आपला रामराम ठोकला. त्यामध्ये त्या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार निवृत्त कर्नल अजय कोठियाल आणि माजी कार्याध्यक्ष भुपेश उपाध्याय यांचा समावेश आहे.
उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने सर्व ताकद पणाला लावली. मात्र, त्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असणाऱ्या कोठियाल यांनाही पराभव पत्करावा लागला. त्या नामुष्कीजनक पराभवानंतर कोठियाल आणि उपाध्याय आपमधून बाहेर पडल्याने त्या पक्षाला आणखी झटका बसला आहे.
निवडणूक निकालानंतर पक्षाकडून योग्य वागणूक न मिळाल्याने कोठियाल नाराज होते, असे समजते. उत्तराखंडमधील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी दिल्लीत नुकतीच आपची बैठक झाली. त्या बैठकीला कोठियाल यांना बोलावण्यात आले नव्हते.
त्यापार्श्वभूमीवर, कोठियाल यांनी आपला रामराम ठोकला. मात्र, त्यांनी नेमके कारण नमूद केले नाही. उपाध्याय यांनी आपमधून बाहेर पडण्याचे कारण देताना पक्षाच्या विचारसरणीबाबत भ्रमनिरास झाल्याचे म्हटले.