सातारा – सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात हॉटेल सिद्धटेक समोर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास होंडा सिटी व क्रेटा कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये चारजण जखमी झाले आहेत. तर साताऱ्यातील एका युवतीचा अपघातात मृत्यू झाला. सर्व जखमींना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नाही. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी तातडीने पोहचून जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास सातारा- कास रस्त्यावर यवतेश्वर घाटाजवळ होंडा सिटी व क्रेटा कारची रात्री पावणेदहाच्या दरम्यान समोरासमोर धडक झाली. अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु या अपघातात गायत्री दीपक आहेरराव (वय 21, रा. शनिवार पेठ, सातारा) ही युवती जागीच ठार झाली. या अपघातात रोहन शेलार ओंकार लोखंडे, सिध्देश किर्दत, अजिंक्य किर्दत हे जखमी झाले आहेत. गायत्री व ओंकार लोखंडे हे क्रेटा गाडीत तर रोहन शेलार, सिध्देश किर्दत, अजिंक्य किर्दत (वय व पत्ता माहित नाही) हे होंडा सिटी गाडीत होते.
या दोन्ही गाडया हॉटेल सिध्दटेकसमोर एकमेकांना धडकल्या. जखमींना वाहनातून बाहेर काढून सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की क्रेटा गाडीच्या समोरच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघात घडला त्यावेळी रस्त्यावर सामसूम आणि पावसाची रिपरिप, अंधार असल्याने तातडीची मदत मिळण्यास अडचणी आल्या. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोचून या अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल केले.
अपघातात ठार झालेली गायत्री सातारा पालिकेच्या अंर्तगत लेखापरीक्षण विभागात कार्यरत होती. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णालयात तर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस अपघातस्थळी होते. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि गायत्रीचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात पाठवला होता.