सातारा -राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यानंतर भिडे गुरुजींच्या विरोधात राज्यभरात आंदोलने सुरू झाली आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीने बस स्थानक परिसरात “रास्ता रोको’ आंदोलन करून भिडे गुरुजी यांच्या अटकेची जोरदार मागणी केली. यावेळी भिडे गुरुजी व त्यांच्या समर्थकांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे भिडे गुरुजी यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे. त्यातच शुक्रवारी आमरावतीतील एका कार्यक्रमात भिडे गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याने राज्यभरातून विविध पक्ष, संघटना यांच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी दुपारी कॉंग्रेस कमिटीसमोर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश प्रतिनिधी रफिकशेठ बागवान, रणजितसिंह देशमुख, सरचिटणीस नरेश देसाई, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अल्पना यादव, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, मनोजकुमार तपासे, संदीप माने, बाळासाहेब शिरसाट, सुरेश कुंभार, संभाजी उतेकर, तानाजी शिंदे, अशोक पाटील, संदीप चव्हाण, जगन्नाथ कुंभार, प्रताप देशमुख, मनीषा पाटील, रजिया शेख, मालन परळकर आदी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी भिडे गुरुजी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस निरीक्षक फडतरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रयत्न यशस्वी होऊन दिला नाही.
भिडे गुरुजींना तात्काळ अटक करा – डॉ.सुरेश जाधव
भिडे गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महापुरुषांची बदनामी चालवली आहे. या बेताल वक्तव्यामुळे तेढ निर्माण होत असून भिडे गुरुजी यांना तात्काळ अटक करून त्यांना समर्थन देणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी यावेळी केली.