पिंपरी – पत्नी, सासरे आणि पत्नीचा मामा यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी मारूंजी येथे घडली.
अभिजीत गणेश खर्डे (वय 38, रा. रिपब्लिक सोसायटी, मारूंजी, ता. मुळशी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. नेहा खर्डे (वय 35) तिचे वडील नितीन बकरे आणि नेहा हिचा मामा विश्वास जोशी अशी आरोपींची नावे आहेत. गणेश नथुजी खर्डे (वय 65, रा. नाशिक) यांनी रविवारी (दि. 1) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अभिजीत यांच्यावर त्यांची पत्नी नेहा हिने विवाहितेचा छळ प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसेच पोटगी मिळण्यासाठीही दावा दाखल केला होता. त्यांच्यात समझोता होऊन 50 लाख रुपये दिल्यावर सर्व केसेस मागे घेण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे 20 लाख रुपये फिर्यादी गणेश आणि त्यांचा मुलगा अभिजीत यांनी पत्नी नेहा हिला दिले होते.
उर्वरित रक्कम मिळण्यासाठी तीनही आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांचा मुलगा अभिजीत यांना त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून अभिजित यांनी 31 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तीनही आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली.