पुणे – पुणे शहरातून दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारास चोरीच्या दुचाकीसह अटक करण्यात आली. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलिसांच्या गस्ती पथकाने केली. त्याच्याकडून घरफोडी व दुचाकी चोरी असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सुजित सुनिल शेळके (24, रा. दांडेकर पूल) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, उपनिरीक्षक भुषण कोते कात्रज ते नवले ब्रीज दरम्यान गस्त घालत होते. यावेळी त्यांना पोतदार शाळेजवळ एक व्यक्ती दुचाकीवरुन संशयास्पदरित्या जाताना दिसला. त्याला थांबण्यास सांगण्यात आले असता, तो न थांबता पळून जाऊ लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्याला थोड्याच अंतरावर पकडले. त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची चौकशी केली असता, त्याने गाडी ससून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून चोरल्याचे सांगितले.
तसेच, बिबवेवाडी येथील घरफोडीचा एक गुन्हाही कबुल केला आहे. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याला दत्तवाडी पोलिसांनी 24 सप्टेंबर 2020 पासून दोन वर्षासाठी शहरातून तडीपार करण्यात आल्याची माहिती समजली.
ही कारवाई पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भुषण कोते, पोलिस अंमलदार सुतार, भोसले, एस.के. भापकर, देशमुख, पवार, जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, सावंत यांच्या पथकाने केली.