कामशेत (चेतन वाघमारे) – गावचे गावपण हरवून शहरीकरण झाले आहे. त्यामुळे शहरासारख्या जीम ग्रामीण भागातील मोठ्या गावात होऊ लागल्या आहेत. आपले शरीर हे तंदुरुस्त आणि पिळदार असले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे हिवाळा सुरू होताच तरुणांची पावले जिमकडे वळाल्याने येथील गर्दी वाढली आहे.
करोनानंतर प्रतिकारशक्ती वाढविण्याकडे आणि सुटलेले पोटे कमी करण्याकडे सगळेच लक्ष देत आहेत. “हेल्थ इज वेल्थ’ हे आता युवा मंडळीच्या लक्षात आले आहे. मग यासाठी अनेकजण मोकळ्या हवेत फिरणे, प्राणायाम, योगासने, सायकल चालवणे, जीममध्ये जाऊन व्यायाम करणे यासारख्या सवयी अंगीकारल्या आहेत. यापूर्वी शेतात अंग मेहनतीची कामे करावी लागत होती. मात्र आता शेतीची कामे यांत्रिक पद्धतीने होत आहेत. यापूर्वी जीम करण्यासाठी तरुणांना शहरी भागात यावे लागत होते. आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाला जीम साहित्य मिळाले असल्याने स्पर्धा वाढू लागली आहे. मात्र, योग्य प्रशिक्षित जीम ट्रेनर हीदेखील अडचण निर्माण होत आहे.
करिअर म्हणून करत आहे निवड
जीमकडे सध्या तरुणाई उत्तम करिअर म्हणून देखील पाहत आहे. जीममध्ये व्यायाम करण्याबरोबरच आर्थिक पाठबळही या माध्यमातून मिळत आहे. यासाठी वैयक्तिक प्रशिक्षकही जीममध्ये कार्यरत असून, यासाठी त्यांना प्रत्येक महिन्याला किमान पाच ते दहा हजार रुपये एका प्रशिक्षणार्थीकडून मिळत असतात.
सप्लिमेंटचा होतोय अतिरेक
आजच्या तरुणाईला प्रत्येक क्षेत्रात झटपट रिझल्ट हवा असतो. त्याला बॉडी बिल्डिंग क्षेत्रही अपवाद नाही. चित्रपटातील अभिनेत्यांना पाहून त्यांच्यासारखी बॉडी बनविण्याच्या नादात सप्लिमेंटचा व स्टेरॉइडचा अतिरेक केला जात आहे. सिक्स पॅक बनविण्यासाठी जिम ट्रेनर, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध विक्रेत्यांकडून स्टेरॉइडच्या वापरातून शरीराला धोका होत आहे.
शरीरावर घातक परिणाम
स्टेरॉइडचा, वेटगेनरचा किंवा अतिरिक्त सप्लिमेंटरी फूड सेवनाने अचानक वजन वाढणे किंवा घटणे यांचा भविष्यात शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात, यासाठी योग्य तो सल्ला आवश्यक आहे.
काहीजण जिममध्ये जाण्यापेक्षा घरीच व्यायाम करण्याला प्राधान्य देत आहेत. यासाठी व्यायामाचे साहित्य खरेदी करून घरीच व्यायामाची खोली तयार करून मोबाइल ऍपच्या माध्यमातून व्यायाम केला जात आहे. मात्र, यातून अनेक दुष्परिणाम होण्याची देखील शक्यता आहे.
सध्या तरुणांमध्ये जिमची आवड निर्माण होत चालेली आहे. परंतु बॉडीबिल्डर बनण्याच्या नादात अनेकजण शॉर्टकट मार्गाचा अवलंबतात. यासाठी अतिरेक पद्धतीने सप्लिमेंट, स्टेरॉइडचा वापर केला जातो. आपले शरीर तंदुरुस्त व पिळदार ठेवण्यासाठी योग्य आहार योग्य प्रमाणात व्यायाम व सातत्य, योग्य प्रशिक्षण, योग्य प्रमाणात झोप यासर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
-प्रवीण खोल्लम