चंदिगढ -आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपने पंजाबमधील ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये त्या राज्यातील ५ मंत्र्यांचा समावेश आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत. इंडिया आघाडीचे घटक असणारे आप आणि कॉंग्रेस हे पक्ष काही राज्यांमध्ये एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
मात्र, पंजाबमध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आता आपने सत्ता असणाऱ्या पंजाबमध्ये दंड थोपटताना उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये प्रसिद्ध पंजाबी अभिनेते करमजित अनमोल यांचे नाव लक्षवेधी ठरले आहे.
त्यांना फरीदकोटमधून रिंगणात उतरवण्यात आले आहे. ते मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्तीय मानले जातात. देशातील बहुतांश राज्यांत राजकीय दबदबा निर्माण करणाऱ्या भाजपचा पंजाबमध्ये फारसा प्रभाव नाही.
त्याशिवाय, शिरोमणी अकाली दलही काहीसा पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्या राज्यात आप आणि कॉंग्रेसमध्येच प्रमुख लढत होण्याची चिन्हे आहेत. ती बाब विचारात घेऊन त्या पक्षांनी पंजाबमध्ये स्वतंत्रपणे लढण्याची राजकीय खेळी केल्याचे मानले जाते.